दलाई लामांचे दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द; केंद्राच्या फर्मानानंतर आयोजकांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 09:35 AM2018-03-06T09:35:28+5:302018-03-06T12:17:05+5:30

आम्ही भारताच्या निर्णयाचा आदर करतो. याविषयी आम्हाला अधिक काही बोलायचे नाही, असे दागपो यांनी म्हटले.

Dalai Lama events in Delhi cancelled Tibetans shift Thank You India function to Dharamsala | दलाई लामांचे दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द; केंद्राच्या फर्मानानंतर आयोजकांचा निर्णय

दलाई लामांचे दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द; केंद्राच्या फर्मानानंतर आयोजकांचा निर्णय

Next

नवी दिल्ली: तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांपासून केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दूर राहण्याचे फर्मान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काढल्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. यासंबंधीच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने दलाई लामांबाबतची आमची भूमिका बदलली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु, यावर समाधान झाल्यामुळे आता तिबेटियन सरकारने स्वत:हून दलाई लामा यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले दिल्लीतील कार्यक्रम रद्द केले आहेत. हे कार्यक्रम आता धर्मशाळा येथे होणार आहेत. तिबेटियन प्रशासनाच्या प्रवक्त्या सोनम दागपो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारताने नेहमीच तिबेटियन निर्वासितांना आश्रय दिला आहे. आम्ही भारताच्या निर्णयाचा आदर करतो. याविषयी आम्हाला अधिक काही बोलायचे नाही, असे दागपो यांनी म्हटले. 

दलाई लामा यंदा वयाची साठी पूर्ण करत आहेत. या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी भारतातील अनेक नेते दलाई लामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत. परंतु यंदा परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून यासंदर्भात मंत्री व अधिकाऱ्यांनी 'विशेष काळजी' घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 22 फेब्रुवारी रोजी विजय गोखले यांच्याकडून कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा यांना सूचना करण्यात आली होती. यामध्ये दलाई लामा यांच्या कार्यक्रमांना कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळावे, असे म्हटले होते. याबाबतची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. सध्या भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध नाजूक वळणावर आहेत. त्यामुळे हा मुद्दा संवेदनशील असल्याचे गोखले यांनी सूचना पत्रात म्हटले होते. त्यानंतर चार दिवसांतच सिन्हा यांनी सरकारच्यावतीने संबंधित निर्देश जारी केले होते. यामध्ये म्हटले आहे की, दलाई लामा यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर मंत्री व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे उचित ठरणार नाही. त्यामुळे संबंधितांनी या कार्यक्रमांचे निमंत्रण स्वीकारू नये, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
येत्या 1 एप्रिल रोजी दिल्लीच्या त्यागराज स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये 'थँक यू इंडिया' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून भारतातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण दिले जाणे, अपेक्षित होते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने अगोदरच या कार्यक्रमाचे निमंत्रण न स्वीकारण्याची सूचना संबंधितांना केली होती. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने आपली बाजू मांडली होती. दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. 
 

Web Title: Dalai Lama events in Delhi cancelled Tibetans shift Thank You India function to Dharamsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.