अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे. विजय रुपानी यांनी काँग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्‍लागार आणि राज्‍यसभा सदस्‍य अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''काँग्रेस नेता अहमद पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये ISचा दहशतवादी नोकरी करत होता'', असा गंभीर आरोप विजय रुपानी यांनी केला आहे. याप्रकरणी रुपानी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

25 ऑक्टोबरला 2 दहशतवाद्यांना अटक 

बुधवारी (25 ऑक्टोबर) गुजरात एटीएसनं आयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अनेक राजकिय नेते दौरे करत आहेत. यामुळे येथे मोठी सुरक्षा व्‍यवस्‍थाही तैनात करण्यात आली आहे. निवडणुकीआधीच एटीएसकडून सुरतमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांची कासीम व ओबैद अशी नावे असल्याचे एटीएस अधिकार्‍यांनी सांगितले. एटीएसच्या कारवाईमुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 
एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये मोठा हल्‍ला करण्याची तयारी केली होती. या दोघांनी अहमदाबादमधील धार्मिक स्‍थळ व इतर ठिकाणांची पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे.  

काँग्रेसनं आरोप फेटाळले

अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी अहमदाबादमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. यावर विजय रुपानी यांनी असा आरोप केला आहे की, 'दहशतवादी मोहम्मद कासीम ज्या भरुच हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता, त्या हॉस्पिटलचे कर्ताधर्ता अहमद पटेलच आहेत'. दरम्यान, 2014 मध्ये अहमद पटेल यांनी हॉस्पिटल प्रशासनकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचं काँग्रेस स्पष्टीकरण देत रुपानी यांचे आरोप फेटाळले आहेत. 

तर दुसरीकडे,  अहमद पटेल यांनी भाजपाचे आरोप पूर्णपणे निराधार असल्‍याचे सांगितले आहे. राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये, अशी विनंती त्‍यांनी केली आहे. शिवाय, गुजरात एटीएसनं केलेल्या कारवाईबाबत त्यांचे अभिनंदन करतो आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

तर काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्‍हणाले आहेत की, 'भाजपा आणि गुजरातचे मुख्‍यमंत्री आपल्‍या अपयशांना झाकण्‍यासाठी अशा प्रकारचे बेफाम आरोप करत आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजपा हताश झाली आहे. 2014मध्ये अहमद पटेल यांनी संबंधित हॉस्पिटलकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे ते हॉस्पिटलशी जोडले गेलेले नाहीत'
    


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.