अहमदाबाद - पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेईल आणि त्यानुसार आपली पुढील वाटचाल ठरवेल, असे त्यांनी म्हटले आहे. पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल यांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेपूर्वी पाटीदारांच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे अल्टिमेटम दिले होते. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत राहून पाटीदारांना कसे आरक्षण देईल. याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी हार्दिक पटेल यांनी केली होती.  
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पाटीदार नेते आणि आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काँग्रेसने आपली भूमिका मांडल्यानंतर पाटीदारांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेत हार्दिक पटेल जाणार नाहीत, असा निर्णय घेतला. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. 
 गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र भाजपाने विकास आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. तसेच पाटीदार हे पारंपरिक मतदार असून, भाजपालाच मत देतील, असा विश्वास भाजपाचे नेते व्यक्त करत आहेत. 
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल गांधी आणि हार्दिक पटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अपेक्षाही वाढल्या  होत्या. मात्र दरम्यान हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिले होते. हार्दिक पटेलनी काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं सांगितलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.  
हार्दिक पटेल यांनी शनिवारी ट्विट केलं आहे. ट्विटरवरुन अल्टिमेटम देताना हार्दिक पटेलने लिहिले होते की, '3/11/2017 पर्यंत काँग्रेसने पाटीदार समाजाला घटनात्मक आरक्षण कसे देणार, यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आपली भूमिका स्पष्ट केली नाहीत तर सुरतमध्ये जे अमित शहांसोबत झालं तसंच तुमच्यासोबत होईल'.