- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्याने भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हार्दिक पटेल काँग्रेसकडे ४० पेक्षा अधिक जागा पटेल उमेदवारांसाठी मागत आहेत, तर दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांना २0 आणि ओबीसींना ३0 ते ३५ जागा देण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.
हार्दिक पटेल यांच्या पसंतीच्या पटेल उमेदवारांना यादीत सहभागी करून घेण्यास काँग्रेस तयार आहे; पण एकूण ४० ते ४५ पटेल उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार आहे. यात काँग्रेसमधील पटेल नेत्यांचीही नावे असतील. काँग्रेसचे विद्यमान ४२ आमदार मैदानात आहेत. त्यामुळे पक्षाला आणखी १३९ उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.
राहुल गांधी यांचा गुजरात दौरा संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार ठरवणार आहे. मात्र, ४२ आमदारांना निवडणुकीची तयारी करावी, असे काँग्रेसने सांगितले आहे. भाजपनेही उमेदवार निवडीच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे. अमित शहा गुजरात ४ ते ९ नोव्हेंबर गुजरातमध्ये असतील आणि या काळात ते उमेदवार निवडीबाबत मुख्यमंत्री विजय रूपानी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

...यंदा वेगळे समीकरण
176 जागांवर २०१२ मध्ये काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील ६० जण निवडून आले. पक्षाने ६ जागा एनसीपीला दिल्या होत्या. त्यांनी २ जागा जिंकल्या होत्या. प्रत्येकी १ जागा अपक्ष व जेडीयूने जिंकली होती.
राहुल गांधी हे समीकरण बदलू पाहत आहेत. गेल्या १५ दिवसांत राहुल आणि हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर यांच्यात जे समीकरण तयार झाले आहे त्यातून असे दिसते की, उमेदवारांचे चित्र खूप वेगळे असेल.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.