ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोनं कर्मचा-यांना जबरदस्त धक्का दिला आहे. विप्रोनं कर्मचा-यांच्या वर्षभरातल्या कामाच्या मूल्यमापनाच्या नावाखाली 600 कर्मचा-यांना नोकरीवरून बडतर्फ केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीच्या 600 कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र हा आकडा 2000 पर्यंतही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

डिसेंबर 2016ला कंपनीकडे 1.79 लाख कर्मचारी संख्या होती. ज्यावेळी कंपनीशी संपर्क साधण्यात आला, त्यावेळी कामगिरीच्या आधारावर मूल्यामापनाची प्रक्रिया खूप कठीण आहे, असं सांगण्यात आलं. दरवर्षी ही संख्या खाली किंवा वर होऊ शकते. मात्र कंपनीनं काढण्यात आलेल्या कर्मचा-यांसंदर्भात कोणतीही टिपण्णी केली नाही.

विप्रोनं सांगितलं की, कर्मचा-यांच्या वार्षिक मूल्यमापन प्रक्रियेत मेंटरिंग, री- ट्रेनिंग सारख्या गोष्टी सामील आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीत अहवाल आणि पूर्ण वर्षाचा आकडा 25 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. आधीच अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये कामगार व्हिसासंदर्भात आयटी कंपन्यांत वातावरण दूषित झालं आहे. कंपन्या ब-याचदा कर्मचा-यांना क्लायंटच्या साइटवर पाठवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील कार्य व्हिसा वापरतात. या देशांमध्ये व्हिसा नियम कडक झाल्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये आव्हानाची परिस्थिती उद्भवली आहे. भारतीय आयटी कंपन्यांना 60 टक्के महसूल हा उत्तर अमेरिकेतल्या बाजारांतून प्राप्त होतो. तसेच 20 टक्के नफा हा यूरोप आणि इतर देशांमधून मिळवला जातो. त्यामुळे एकंदरीत आयटी कंपन्यांवर अनिश्चिततेचे वादळ घोंगावताना दिसत आहे.