न्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 02:57 PM2018-01-20T14:57:40+5:302018-01-20T15:55:11+5:30

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यापुढे होणार आहे.

CJI Dipak Misra to hear PIL on Judge Loyas death | न्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार

न्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार

Next

नवी दिल्लीः सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. येत्या सोमवारी - 22 तारखेला अन्य दोन न्यायमूर्तींसोबत ते दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी अलीकडेच बंडाचा झेंडा फडकवत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाचा मुद्दाही त्यांनी ठळकपणे मांडला होता. स्वाभाविकच, या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. ती सुरू असतानाच, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी या खटल्यातून स्वत:ला दूर केलं होतं. त्यामुळे न्या. लोया मृत्यूप्रकरणाची सुनावणी कोणत्या खंडपीठाकडे सोपवली जाणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालीच या खटल्याची सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.  


न्या. लोया यांचे १ डिसेंबर २०१४ च्या पहाटे नागपूर येथे एका खासगी इस्पितळात निधन झाले होते. परंतु, त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याची शंका त्यांच्या बहिणीनं उपस्थित केली होती. त्यांचा मृत्यू आणि त्यांच्याकडील सोहराबुद्दीन शेख चकमक खटला यांचा काहीतरी संबंध असू शकतो, असा त्यांना संशय आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह गुजरातमधील अनेक बडे अधिकारी आरोपी होते. त्यातून अमित शहा यांची मुक्तता झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र आणि निःपक्ष चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे पत्रकार बंधुराज लोणे यांनी केली आहे. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सुनावणी करण्याची तयारी दर्शविली होती. आता ही सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातही या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच!

न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचा खुलासा नागपूर पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी नुकताच केला आहे. नागपूर पोलिसांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. हे स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

'आम्हाला कुणावरही संशय नाही!'

न्यायमूर्तींच्या बंडानंतर विरोधकांनी न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. मात्र त्याचवेळी, न्या. लोया यांचा मुलगा अनुजने पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला कुणावरही संशय नसल्याचं स्पष्ट केलंय. कुठल्याही संशयास्पद परिस्थितीत माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला नाही आणि आम्हाला कोणत्याही चौकशीची गरज वाटत नाही, असं त्यानं म्हटलं होतं. 
 

Web Title: CJI Dipak Misra to hear PIL on Judge Loyas death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.