पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 05:56 PM2019-02-12T17:56:18+5:302019-02-12T17:57:28+5:30

विमानवाहू नौका विक्रीचं वृत्त चीननं फेटाळल्यानं भारताला दिलासा

China Plays Down Media Reports Of Selling Aircraft Carrier liaoning To Pakistan | पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार

पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार

Next

नवी दिल्ली: चीननं तयार केलेली पहिली विमानवाहू नौका लाऊनिंग पाकिस्तानला दिली जाणार असल्याचं वृत्त बीजिंगनं फेटाळलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. दुसऱ्या देशांना नौदलाची जहाजं विकताना कठोर नियमांचं पालन करावं लागतं, असं चीननं विमानवाहू नौकेचं वृत्त फेटाळताना म्हटलं. 

चिनी सरकारनं त्यांची पहिली आणि एकमेव विमानवाहू नौका 'लाऊनिंग' पाकिस्तानला विकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त एका पाकिस्तानी दैनिकानं 10 फेब्रुवारीनं दिलं होतं. पाकिस्तानी नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी लाऊनिंग नौका चीनकडून देण्यात येणार आहे, असं पाकिस्तानी वृत्तपत्रानं म्हटलं होतं. मात्र चीननं हे वृत्त फेटाळलं. लाऊनिंग चीनकडून पाकिस्तानला दिलं गेलं असतं, तर भारताच्या तुलनेत पाकिस्तान नौदल अधिक सामर्थ्यशाली झालं असतं. विशेष म्हणजे लाऊनिंगमध्ये अनेक बदल करुन, ते अधिक अत्याधुनिक स्वरुपात पाकिस्तानला देण्यात येणार असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं होतं. 

पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेलं वृत्त चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पूर्णपणे फेटाळून लावलं. 'मी अद्याप ते वृत्त पाहिलेलं नाही. मात्र दुसऱ्या देशांना नौदलासाठी वापरली जाणारं जहाजं विकण्याआधी चीन नेहमी नियमांचं पालन करतो,' असं मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनाईंग यांनी म्हटलं. 'पाकिस्तानी लष्करासोबत चीनचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे चीन पाकिस्तानासाठी 4 अत्याधुनिक जहाजं तयार करत आहे,' असंदेखील पाकिस्तानी वृत्तपत्रानं म्हटलं होतं. 

चिनी लष्कराच्या अभ्यासकांनीदेखील लाऊनिंगच्या विक्रीचं वृत्त फेटाळून लावलं. चिनी लष्करानं लाऊनिंगच्या विक्रीसाठी कोणताही करार केला नसल्याचं वृत्त चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रानं दिलं. यासारखा कोणताही करार सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही चिनी वृत्तपत्रानं स्पष्ट केलं. लाऊनिंग या विमानवाहू नौकेचा वापर प्रशिक्षण आणि युद्धासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे चीन ही नौका विकण्याची शक्यता नाही, असं चिनी संरक्षण दलाच्या अभ्यासकांनी म्हटलं. 
 

Web Title: China Plays Down Media Reports Of Selling Aircraft Carrier liaoning To Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.