लखनऊ, दि. 13 - गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 'योगी आदित्यनाथ सरकार हे खुनी सरकार आहे, घटनेतील लहानग्यांचा मृत्यू नाही तर हत्या झालीये' या मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही तर राज्य कसं सांभाळणार अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते आणि अभिनेते राज बब्बर यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं.   
 लहान मुलांचे जे मृत्यू झाले आहेत त्यामध्ये आता सरकार काय शोधणार आहे? हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले आहेत, रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे झाले आहेत हे योगी आदित्यनाथांनी मान्य करून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं राज बब्बर यांनी म्हटलं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात दोन दिवसात ३० मुलांचा जीव गेला. सध्याच्या घडीला हा आकडा 72 वर गेला आहे. या सगळ्यामुळे आपण व्यथित झालो असून योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत असं राज बब्बर यांनी म्हटलं. योगी आदित्यनाथ ज्या रूग्णालयाचा दौरा करून जातात तिथे अशी दुर्घटना होऊच कशी काय शकते? असा प्रश्नही बब्बर यांनी विचारला.

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणाती दोषींवर करणार कठोर कारवाई - योगी आदित्यनाथ

बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  आज दिला. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने झालेल्या या दुर्घटनेत 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता.   
लहान मुलांसाठी काळ ठरलेल्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला योगी आदित्यनाथ यांनी आज भेट दिली. त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा त्यांच्यासोबत होते. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जो दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही.  त्यांच्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल."   योगी यांनी इंसेफलाइटिसमुळे झालेल्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. यावेळी भावूक झालेल्या योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतीत असल्याची तसेच त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.  
 गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये 70 बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17   नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती.  त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.  बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, नेमके हे मृत्यू कशामुळे झाले, हे सांगण्यास सरकार तयार नाही, तसेच मृतांचे पोस्टमार्टेमही करण्यात आले नाही, असे समजते.