संस्थेवर टीका करणं सोपं, सुधारणा घडवणं कठीण- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:41 PM2018-08-15T17:41:24+5:302018-08-15T17:46:51+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर सरन्यायाधीशांचं भाष्य

chief justice deepak misra breaks silence says it is easy to criticize institution | संस्थेवर टीका करणं सोपं, सुधारणा घडवणं कठीण- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

संस्थेवर टीका करणं सोपं, सुधारणा घडवणं कठीण- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

googlenewsNext

नवी दिल्ली: कोणत्याही संस्थेवर टीका करणं सोपं असतं. मात्र त्या संस्थेत सुधारणा घडवून आणणं अवघड असतं, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जानेवारी महिन्यात पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीशांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले होते. न्यायाधीशांच्या त्या बंडावर सरन्यायाधीशांनी अखेर सात महिन्यांनी भाष्य केलं आहे. 





कोणत्याही संस्थेवर टीका करणं किंवा ती संस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करणं सोपं आहे. मात्र वैयक्तिक आशा-अपेक्षा दूर ठेवून त्या संस्थेच्या सुधारणांसाठी झटणं कठीण असतं, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मिश्रा बोलत होते. 'कोणत्याही संस्थेला पुढे नेण्यासाठी सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय आवश्यक असतात. परिपक्वता, जबाबदारीचं भान आणि धैर्य असेल, तरच एखादी संस्था नव्या उंचीवर पोहोचू शकते,' असं मिश्रा म्हणाले.




 
12 जानेवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी (न्यायमूर्ती चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ) पत्रकार परिषद घेतली होती. या न्यायमूर्तींनी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. लोकशाही धोक्यात असल्याची भावना या चारही न्यायाधीशांनी बोलून दाखवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ होती. 

Web Title: chief justice deepak misra breaks silence says it is easy to criticize institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.