नवी दिल्ली - मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात  एनआयएकडून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात आली असून या आठवड्यात हे आरोपपत्र विशेष न्यायालयासमोर सादर केले जाईल. 
झाकीर नाईकच्या संस्था आणि त्याच्या संशयास्पद व्यवहारांचा एनआयकडून तपास सुरू आहे. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईककडून प्रेरणा घेतल्याचे कबूल केल्यानंतर झाकीरने भारतातून पळ काढला होता. दरम्यान, गतवर्षी 18 नोव्हेंबर रोजी एनआयएने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 
दरम्यान,  काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने पोलिसांच्या चौकशीमध्ये दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा खुलासा केला होता. वर्ष 2012 पासून दाऊद इब्राहिम झाकीर नाईकला पैसे पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा इकबाल कासकरने केला.   
मुंबईतले काही उद्योगपती दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाकीर नाईकची मदत करतात आणि त्याला पैशांचा पुरवठा करतात असा खुलासा इक्बालने केला होता. झाकीर नाईकच्या एनजीओद्वारे हवाला नेटवर्कलाही पैसा पुरवला जातो असं कासकर म्हणाला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे आणि त्याला पाकिस्तानात सुरक्षाही पुरवली जाते असा खुलासा यापूर्वी कासकरने केला होता.