पंचकुला हिंसा प्रकरणी हनीप्रीतवर आज आरोप निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:40 AM2018-01-11T10:40:37+5:302018-01-11T10:43:29+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता

charges to be framed against Honeypreet in Panchkula Violence Case | पंचकुला हिंसा प्रकरणी हनीप्रीतवर आज आरोप निश्चिती

पंचकुला हिंसा प्रकरणी हनीप्रीतवर आज आरोप निश्चिती

Next

हरियाणा - बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकली होती. या हिंसेत 35 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने हिंसा भडकावल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या चौकशीत तिने आपल्यावरील आरोप मान्यही केले होते. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार आहेत. दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटबाबत आज सुनावणीत चर्चा होणार आहे. दरम्यान हनीप्रीतला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. 

पंचकुलामध्ये 25 ऑगस्टला राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 34 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हिंसाचारादरम्यान, जमावाने 100 हून अधिक गाड्यांना आग लावली होती आणि मीडियावर हल्ला केला होता. 


दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले. 

बाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.

हनीप्रीत हिच्यावर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने हिंसाचार भडकविण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये दिल्याचे उघड झाले होते. पंचकुलामधील नाम चर्चा घरचे प्रमुख चमकौर सिंहने याबाबत खुलासा केला होता. डे-यामध्ये 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीनंतर हनीप्रीतने चमकौर यांना पैसे पाठविले होते.  
 

Web Title: charges to be framed against Honeypreet in Panchkula Violence Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.