नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक्सच्या दिवशी चुकून पाकिस्तानात गेलेला शिपाई चंदू बाबूलाल चव्हाण (२२) यांना लष्करी न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले आहे. त्यांना न्यायालयाने तीन महिन्यांच्या शिक्षेची शिफारस केली आहे. मात्र त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही, असे कळते.

मिलालेल्या माहीतीनुसार चंदू यांच्यावर लष्करी नियमाप्रमाणे फक्त सौम्य औपचारिक कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. त्यामुळे कोर्ट मार्शलद्वारे चंदू यांना तुरुंगात धाडणार नसून, फक्त त्यांना तीन महिने कोणतीही सुट्टी मिळणार नाही. संरक्षण मंत्रालयातल्या उच्च सूत्रांकडून ही माहिती समजते आहे.

लष्कराची शिस्त मोडल्याचा आरोप करुन चंदू चव्हाण यांना तीन महिन्याचा कारावास ठोठावल्याची बातमी सकाळी पीटीआयकडून देण्यात आली होती. मात्र, आता याबाबतची नेमकी माहिती समोर आल्यानं चंदू चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चव्हाणवर जनरल कोर्ट मार्शल यांच्याकडून खटला चालला. मी अनवधानाने सीमा ओलांडली, असे त्यांनी म्हटल्याचे कळते. जानेवारीत त्याला पाकने भारताकडे सोपवले. चंदू चव्हाणचे दोन वर्षांचे निवृत्तीवेतनही जप्त झाले. ते पाक सैन्याला शरण गेले होते, असे तेथील लष्कराने म्हटले होते. कमांडर्सच्या वाईट वागणुकीमुळे चव्हाण सीमा ओलांडून आले, असेही इंटर सर्व्हिसेसने म्हटले होते. चव्हाणना दिलेली शिक्षा चुकीची आहे, असे त्यांच्या आजोबांचे म्हणणे आहे. शिक्षेमुळे त्यांच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असे समजते.