सीमारेषेवर कुरापती सुरूच, भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 09:10 AM2019-03-01T09:10:38+5:302019-03-01T09:11:53+5:30

कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांचीही चमकमक झाली असून जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

Ceasefire Violation on the border, the execution of two terrorists from the Indian Army | सीमारेषेवर कुरापती सुरूच, भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सीमारेषेवर कुरापती सुरूच, भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Next

श्रीनगर - एकीकडे पाकिस्तानकडून भारतीय वायू सेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपविण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी रेंजर्संकडून सीमारेषेवर कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानी रेंजर्संने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलंय. त्यास, भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, कुपवाडा येथे सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांचीही चमकमक झाली असून जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. शुक्रवारी सकाळीच सीमाभागात दहशतवादी घुसल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा जवानांनी शोधमोहिम राबवून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामा हल्ल्यानंतर सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) रोजीही सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले होते. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळीही भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारी) भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने राजौरा जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत हवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 



 

Web Title: Ceasefire Violation on the border, the execution of two terrorists from the Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.