Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 12:47 PM2018-02-05T12:47:52+5:302018-02-05T12:53:40+5:30

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला.

Ceasefire Violation: In 35 days 160 times Ceasefire Violation by Pakistan | Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

Next

श्रीनगर -   सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले आहेत. तसंच या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चार जण जखमीदेखील झाले आहेत. भारतीय जवानांकडून पाकच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. 
 
पाकिस्तानचा भ्याड हल्ला 
गेल्या 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.  4 फेब्रुवारी 2018 पर्यंत भारतीय लष्करातील एका कॅप्टनसही 8 जवानांना वीरमरण आले आहे, मात्र दुसरीकडे यावेळी 10 दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे.   
पाकिस्ताननं 2017 मध्ये 860 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. तर दुसरीकडे 2018मध्ये 160 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. 

दरम्यान, 2014मध्ये 51 जवान शहीद झाले होते तर 110 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 2015मध्ये 41 जवान शहीद झाले होते तर 113 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.  2016 मध्ये सुरक्षा दलानं 88 जवानांना गमावलं आहे, मात्र याचवेळी 165 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. 2017 मध्ये 83 जवानांना वीरमरण आले तर भारतीय लष्करानं 'ऑपरेशन ऑलआऊट'च्या माध्यमातून 218 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

4 फेब्रुवारी : पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार

राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. पूंछ परिसरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. जानेवारीत पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांचा मारा व गोळीबारामध्ये सात भारतीय जवान शहीद झाले होते व आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय 70 जण जखमी झाले होते. 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान पाकिस्तानी लष्कराने जम्मू, कठुआ, सांबा जिल्ह्यांतील सीमेवर तसेच पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात हल्ला केला होता. 

कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरण
पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कॅप्टन कपिल कुंडू तसेच रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. या शहीद जवानांपैकी दोघे जम्मू-काश्मीर, एक मध्य प्रदेशचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचा 10 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. ते 23 व्या वर्षात पदार्पण करणार होते. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणातील गुरगाव जिल्ह्यातील रणसिका गावचे ते मूळ रहिवासी होते.

मॉर्टेर्स बाँम्बचा मारा
पाकिस्तानने भारतीय लष्करावर अ‍ॅण्टी टँक गन मिसाइल, एलएमजी, मॉर्टेर्स बॉम्बचा मारा केला. पूंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये बीएसएफचा एक जवान व या भागातील इस्लामाबाद गावातील शाहनवाझ बानो व यासीन अरिफ ही दोन मुलेही जखमी झाली.

84 शाळा 3 दिवस बंद
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या मा-यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुंदरबनी ते मांजाकोटे भागातील 84 शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी हल्ल्यात भारतीय लष्कराचा कॅप्टन व तीन जवान शहीद झाल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Ceasefire Violation: In 35 days 160 times Ceasefire Violation by Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.