डीएमच्या घरावर छापा; पैसे मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:33 PM2019-07-10T15:33:51+5:302019-07-10T16:07:56+5:30

बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. उत्तर प्रदेशातील खाण घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. 

cbi raids at ias abhay singh residence in bulandshahr | डीएमच्या घरावर छापा; पैसे मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

डीएमच्या घरावर छापा; पैसे मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

Next
ठळक मुद्देबुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे.उत्तर प्रदेशातील खाण घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. अभय सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून ती मोजण्यासाठी मशिन मागवावी लागली असल्याची माहिती मिळत आहे.

बुलंदशहर - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी (9 जुलै) 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. भ्रष्टाचार आणि हत्यारांच्या तस्करीसह 30 वेगवेगळ्या प्रकरणांसाठी या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. उत्तर प्रदेशातील खाण घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 

मागील सरकारच्या काळात अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हा दंडाधिकारी असताना त्यांच्यावर खाण घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. सीबीआयने मारलेल्या छाप्यांमध्ये अभय सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून ती मोजण्यासाठी मशिन मागवावी लागली असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


बुधवारी (10 जुलै) सकाळी सीबीआयचे अधिकारी अभय सिंह यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचले. सीबीआयच्या टिमने जवळपास दोन तास अभय सिंह यांची चौकशी केली. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हाधिकारी होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय सिंह यांच्या घरी सीबीआयला नोटांचे बंडल मिळाले. ते मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

सीबीआयने मंगळवारी 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यामध्ये वेगवेगळ्या 30 प्रकरणांमध्ये अनेक फर्म्स, प्रमोटर्स, कंपनी, संचालक आणि बँक अधिकारी आदी लोकांचा समावेश आहे. याअगोदर 2 जुलै रोजी केलेल्या कारवाईत 12 राज्यांमधील 50 शहरांतील 50 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईत 16 बँक घोटाळ्यातील प्रकरणांचा समावेश होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार  दिल्ली, जम्मू, श्रीनगर, जयपूर, गोवा, ओडिसा, आंध्र प्रदेश,  मुंबई, लुधियाना, ठाणे,  भोपाळ, सूरत, कोलार, वलसाड, पुणे, पलनी, गया, गुरुग्राम, चंदिगडसह अन्य अनेक ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. 
 

Web Title: cbi raids at ias abhay singh residence in bulandshahr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.