Can not release a film in this country ?; Bombay High Court expressed disappointment | या देशात साधा एक सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही?; मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देनरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने व्यक्त केली चिंता'या देशात साधा एक चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही'देशातील लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत असल्याची चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केली

मुंबई - या देशात साधा एक चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने पद्मावती सिनोमावरून सुरू असलेल्या वादावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वांरवार घाला घातला जात आहे. देशातील लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत असल्याची चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा अद्याप छडा न लागल्यावरुन उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला चांगलंच खडसावलं. न्यायालयाने सांगितलं की, 'या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन होत आहे. देशातील लेखक, विचारवंत भीतीच्या छायेत आहेत. आपण जर आपलं मत व्यक्त केलं, तर आपल्यावरही हल्ला होईल अशी भीती त्यांना वारंवार वाटत आहे. आपण इथे साधा एक चित्रपट (पद्मावती) रिलीज करु शकत नाही'. 

उच्च न्यायलयाने पद्मावती सिनोमावरून सुरू असलेल्या वादावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली समाजातील काही घटकांना पटत नाहीत म्हणून लोकांनी आपली मतं मांडायची नाहीत का? असा सवालही उच्च न्यायालयाने यावेळी विचारला. 'काही लोक उघडपणे कलाकार आणि इतरांना धमकी देत असताना राजस्थानच्या मुख्यमंत्री मात्र आपण चित्रपट रिलीज करु शकत नसल्याचं सांगत आहेत. ही परिस्थिती आहे येथे. आज आपण अशा ठिकाणी येऊन उभे आहोत', असं म्हणत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. 

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने वरिष्ठ तपास अधिका-यांची बैठक घेऊन दोन आठवड्यांत आपलं उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. 

‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले
चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.

निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ आहे असे कारण देत चित्रपट सेन्सॉर बोर्डानेही अद्याप या चित्रपटाला जाहीर प्रदर्शनाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ‘व्हायकॉम १८’च्या प्रवक्त्याने रविवारी एका निवेदनात म्हटले की, आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत व या देशातील कायदे व सेन्सॉर बोर्डासह सर्व वैधानिक संस्थांविषयी आम्हाला आदर आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा मुंबईत माध्यम प्रतिनिधींसाठी खासगी शो आयोजित केला होता. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच संदर्भात बोर्डाचे एक सदस्य अर्जुन गुप्ता यांनी भन्साळी प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला.

चित्रपटात राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.


Web Title: Can not release a film in this country ?; Bombay High Court expressed disappointment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.