बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 07:44 AM2019-01-18T07:44:37+5:302019-01-18T07:59:24+5:30

मृत मुलाच्या हातात पिस्तुल सापडल्यानं गूढ वाढलं; पोलिसांकडून तपास सुरू

Bsf Jawan Tej Bahadur yadavs Son found dead | बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

रेवाडी: लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप केल्यानं चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह काल रेवाडीतील शांती विहार कॉलनीमधील राहत्या घरी आढळून आला. दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहित त्याच्या घरी आला होता. रोहितचे वडील तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. रोहितची आई गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतली. त्यावेळी रोहितची खोली बंद होती. अनेकदा प्रयत्न करुनही दरवाजा न उघडल्यानं त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 



रोहितनं आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी त्याची खोली आतून बंद होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 'खोली उघडल्यावर रोहित पलंगावर मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या हातात एक पिस्तुलदेखील होतं. त्याचे वडील कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यांना आम्ही या घटनेची माहिती दिली आहे,' असं पोलिसांनी सांगितलं. रोहितच्या हातात सापडलेलं पिस्तुल परवानाप्राप्त होतं की नाही, याबद्दलचा तपास सध्या पोलीस करत आहेत. 




बीएसएफमधये असताना तेज बहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला. यावरुन मोठा वादही निर्माण झाला. याची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली होती. यानंतर शिस्तभंगाप्रकरणी कारवाई करत बीएसएफनं यादव यांना निलंबित केलं. मूळचे हैदराबादचे रहिवासी असलेले तेज बहादूर यादव त्यांच्या कुटुंबासह रेवाडीत राहतात. 

Web Title: Bsf Jawan Tej Bahadur yadavs Son found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.