पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:34 AM2019-05-02T03:34:16+5:302019-05-02T03:34:46+5:30

‘हाता’ची पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : अकाली दल, आपला फुटीची डोकेदुखी

Breakthrough in a triangular match in Punjab will be the decisive factor | पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

Next

मनीषा मिठबावकर 

चंदीगढ : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांपैकी गुरुदासपूर, भटिंडा या जागा महत्त्वाच्या मानल्या जातात. हेच महत्त्व लक्षात घेत भाजपने अभिनेता सनी देओलला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली. तर भटिंडामधून भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रतिष्ठेच्या या दोन्ही जागांवर ‘हात’ची पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने येथे प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही तुल्यबळ पक्षांना गेल्या वेळेप्रमाणेच तगडे आव्हान देण्यासाठी आपचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, आप, अकाली दलाला लागलेल्या फुटीच्या ग्रहणामुळे विभागल्या जाणाऱ्या मतांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांना आहे. शिरोमणी अकाली दल हा येथील मोठा प्रादेशिक पक्ष. गेली अनेक वर्षे येथे अकाली दल-भाजप, काँग्रेसमध्ये थेट लढत रंगत असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने येथील राजकारणात उडी घेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. मात्र आता आप, अकाली दलातील फुटीर नेत्यांनी वेगळे पक्ष काढत तिसरी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जागाही ठरणार निर्णायक
पंजाब लोकसभा मतदारसंघातील अमृतसर हादेखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ येथे भाजपची मजबूत पकड होती. २००४ ते २०१४पर्यंत येथे नवज्योतसिंग सिद्धू भाजपचे खासदार होते. मात्र, पक्षातील मतभेदानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा या जागेवर काँग्रसकडून गुरजीत सिंह अलूजा, भाजचे हरदीप सिंह पुरी तर आपकडून कुलदीप सिंह धालीवाल रिंगणात आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे आपचे डॉ. धर्मवारी गांधी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रणीत कौर यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यापूर्वी या मतदारसंघात सर्वाधिक प्रभाव हा काँग्रेसचा होता. आता आपशी फारकत घेत डॉ. गांधी पीडीएत सहभागी झाल्यामुळे काँगे्रसला ही जागा परत मिळवण्याची संधी आहे.

या मतदारसंघावर अकाली दलाचे वर्चस्व पाहायला मिळते. २००९, २०१४ अशाप्रकारे सलग दोनदा येथे अकाली दलाचे शेरसिंग घुबाया निवडून आले होते. त्यानंतर पक्षातील मतभेदामुळे आता घुबाया काँग्रेसकडून या जागेवर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल लढणार आहेत. १९८५ नंतर एकदाही या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

१९ मे रोजी मतदान जागा - (१३) अमृतसर, आनंदपूर साहेब, खडूर साहेब, गुरुदासपूर, जालंधर, पतियाला, फतेहगड, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, संगरूर, होशियारपूर.

Web Title: Breakthrough in a triangular match in Punjab will be the decisive factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.