BJP's two seats in Gujarat are in crisis | गुजरातेतील भाजपाच्या २ जागा संकटात

अहमदाबाद - गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत.
देशभर राज्यसभेच्या रिक्त ५८ जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यातील ४ जागा गुजरातेतील असून, त्या सगळ््या भाजपकडे आहे. भाजपा आणि काँग्रेसने गेल्या वर्षी विधानसभेच्या जेवढ्या जागा जिंकल्या, त्यावरून राज्यसभेत हे दोन्ही पक्ष २-२ उमेदवार पाठवू शकतात.
२०१२ मध्ये भाजपाने राज्यात ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यात २०१७ मध्ये १६ जागांची घट होऊन ९९ जागाच राहिल्या. काँग्रेसने २०१२ मधील ६० जागांवरून गेल्या वर्षी ७७ जागांवर उडी मारली. भाजपासमोर अरुण जेटली, पुरुषोत्तम रूपाला, मनसुख मांडविया आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते शंकरभाई वागद यांच्यापैकी कोणत्या दोन जणांना उमेदवारी द्यायची, असे संकट उभे आहेत. वागद वगळता तिघेही केंद्रीय मंत्री आहेत. राज्यसभेच्या निवडणूक नियमांनुसार, एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३८ मतांची गरज असते. त्यानुसार, दोन्ही पक्ष प्रत्येकी २ उमेदवार निवडून आणू शकतात. गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शक्तिसिंह गोहिल, अर्जुन मोढवाडिया, सिद्धार्थ पटेल, तुषार चौधरी आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी हे खूप इच्छुक असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.


Web Title:  BJP's two seats in Gujarat are in crisis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.