BJP's defeat in Gujarat is inevitable - Yogendra Yadav | गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणे अटळ - योगेंद्र यादव

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ९५ ते ११३ जागा मिळतील आणि भारतीय जनता पार्टीला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागेल, असे भाकित निवडणूक सांख्यिकीतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केले आहे. विविध जनमत चाचण्यांतील आकडेवारीच्या आधारे ते या निष्कर्षाप्रत आले आहेत.
योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, गुजरातच्या निवडणूक निकालांबाबत दोन शक्यता मला दिसत आहेत. काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४३ टक्के मते मिळतील. या टक्केवारीमुळे काँग्रेसला ९५ व भाजपाला ८६ जागा मिळू शकतील. दुसºया शक्यतेप्रमाणे काँग्रेसला ४५ टक्के व भाजपाला ४१ टक्के मते मिळतील. तसे झाल्यास काँग्रेसच्या जागा ११३ पर्यंत वाढतील तर भाजपाच्या जागा अगदी ६५ पर्यंत खाली येतील.
योगेंद्र यादव यांनी आणखी तिसरी शक्यताही व्यक्त केली आहे. त्यानुसार भाजपाला याहूनही खूप मोठा पराभव सहन करावा लागू शकेल. एबीपी न्यूज, सीएसडीएस व लोकनीती यांनी शेवटची जी जनमत चाचणी घेतली, त्यातही काँग्रेस व भाजपा यांना प्रत्येकी ४३ टक्के मते मिळतील आणि भाजपाच्या ९५ व काँग्रेसच्या ८२ जागा निवडून येतील, असा निष्कर्ष काढला होता.

तोच कल कायम
आॅगस्टपासून सातत्याने भाजपाच्या मतांमध्ये घट होत असल्याचे विविध जनमत चाचण्यांतून दिसून आले आहे. तोच कल अखेरपर्यंत कायम राहतो या गृहितकावर भाजपाची मते आणखी घटतील व काँग्रेस विजयी होईल, असे अंदाज बांधण्यात येत आहेत.