BJP will hold a protest rally on Jantar Mantar and Mamta rally in Bengal | भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली
भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन निवडणुकीला गालबोट लागलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची मागणी केली. तसेच आज नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार आहे. 

तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक पवित्रा घेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडण्याचा प्रकार पश्चिम बंगालच्या अस्मितेशी जोडून भाजपावर निशाणा साधला आहे. हिंसाचारानंतर विद्यासागर कॉलेजला पोहचलेल्या ममता यांनी ईश्वरचंद्र यांची प्रतिमा तोडण्याच्याविरोधात तृणमूलकडून रॅली काढण्याची घोषणा केली आहे. अमित शहा देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांच्याविरोधात कोणी प्रदर्शन करु शकणार नाही. प्रतिमा तोडणारे भाजपाचे गुंड होते असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपवली आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारलं जातं. उमेदवारांवर हल्ले केले जातात. मतदान केंद्र बळकावली जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांची रॅलीला परवानगी दिली जात नाही. पश्चिम बंगालमध्ये गॅंगस्टरचं सरकार आलेलं आहे. अमित शहा यांच्या रॅलीवर झालेला हल्ल्याचा निषेध करत पश्चिम बंगालमधील भाजपाचा विजय जवळ आलेला आहे असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 

Video : अमित शहांच्या रॅलीमध्ये दगडफेक, हाणामारी; कोलकात्यामध्ये तणाव

मंगळवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र देऊ न शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले होते. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमल्याने त्याठिकाणी तणावाचे वातावरण होते.

सातव्या टप्प्यात लोकसभेच्या उत्ती कोलकाता मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा आले होते आहेत. तसेच याआधीही जय श्री राम म्हणत मी कोलकातामध्ये येत आहे, हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असे आव्हान शहा यांनी दिले होतं.     


Web Title: BJP will hold a protest rally on Jantar Mantar and Mamta rally in Bengal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.