भाजप हा उत्तर भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:42 AM2019-05-28T04:42:43+5:302019-05-28T04:42:59+5:30

भाजप हा हिंदीभाषिक राज्यांतील पक्ष असल्याची टीका राजकीय विश्लेषक सातत्याने करीत असतात.

BJP is not limited to North India - Prime Minister Modi | भाजप हा उत्तर भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही- पंतप्रधान मोदी

भाजप हा उत्तर भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही- पंतप्रधान मोदी

googlenewsNext

वाराणसी : भाजप हा हिंदीभाषिक राज्यांतील पक्ष असल्याची टीका राजकीय विश्लेषक सातत्याने करीत असतात. पण आम्ही यंदा कर्नाटकात मोठे यश मिळवले आहे. एवढेच नव्हे, तर गोवा, ईशान्य भारत तसेच आसाममध्ये आमची सरकारे आहेत. आमचा प्रभावही देशभर आहे. तरीही भाजपला हिंदी राज्यांतील पक्ष म्हणणे चुकीचे आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले.
त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजकीय पंडित निवडणुकांची केमिस्ट्री मांडत असतात. पण या केमिस्ट्रीवर भाजपने आपल्या गणिताद्वारे मात केली आहे. मात्र समाजशक्ती, आदर्श व संकल्पाचे जे रसायन आहे ते कधीकधी ठोकळ गुणाकार, भागाकारांनाही पराभूत करते. हे सत्य लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर राजकीय निरीक्षकांनी मान्य करायला हरकत नाही. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे.
भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारसरणीमुळे त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगालमध्ये हत्या केली जात आहे, असा आरोप मोदी यांनी सोमवारी केला. अमेठीतील भाजपच्या विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येच्या निमित्ताने त्यांनी हा उल्लेख केला. मी देशासाठी पंतप्रधान आहे. पण या शहरातील जनतेसाठी मात्र मी खासदार म्हणजेच एक सेवक आहे आणि सेवक म्हणूनच जनतेची कामे करेन.
मोदी यांचे विमानतळावर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले. त्यांचे वाराणसीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. वाराणसीमध्ये मोदींना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पाच लाख मते जास्त मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकांनंतर मी वाराणसीत येईन, असे मतदारांना दिलेले आश्वासन मोदी यांनी पूर्ण केले. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. ते म्हणाले की, मोदींसारखा खासदार मिळणे हे मतदारांचे भाग्य आहे.
या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही भाषण झाले. (वृत्तसंस्था)
>काशी विश्वेश्वराचे घेतले दर्शन
लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यांच्यासमवेत योगी आदित्यनाथ व अमित शहा हेही होते. सुमारे एक तास ते मंदिरात होते.

Web Title: BJP is not limited to North India - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.