ठळक मुद्देभाजपा नगरसेवक प्रवीण कहर यांची आपल्या पुतण्यांसोबत मिळून महिलेला जबर मारहाणपुतण्यांना अटक करण्यात आली असून भाजपा नगरसेक प्रवीण कहर घटनेनंतर फरार आहेतआपल्या जावयासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा प्रवीण कहर यांचा आरोप

सूरत - महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, भाजपा नगरसेक प्रवीण कहर मात्र घटनेनंतर फरार आहेत. आपल्या जावयासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवक प्रवीण कहर यांनी आपल्या पुतण्यांसोबत मिळून महिलेला जबर मारहाण केली. मंगळवारी ही घटना घडली. 

वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक असणारे प्रवीण कहर आपल्या पुतण्यांसोबत मिळून रंडेर परिसरातील महिलेच्या घरात जबरदस्ती घुसले. यावेळी त्यांचा जावई जयेश टेलरदेखील तिथेच होता. नगरसेवक आणि त्याच्या पुतण्यांनी सर्वात आधी महिला आणि जयेश टेलर यांना घराबाहेर खेचत आणलं आणि जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपी त्यांना नानपुरा क्रॉसरोडला घेऊन गेले आणि परत मारहाण कऱण्यास सुरुवात केली. 

जयेश टेलर तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला, पण पीडित महिला अद्याप आरोपींच्या ताब्यात होती. यानंतर त्यांनी महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केली आणि फरार झाले. घटनेनंतर पीडित महिला आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी कशीबशी अथवालाइन्स पोलीस ठाण्यात पोहोचली. पण हे प्रकरण रंडेर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याचं सांगत पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आणि महिलेला परत पाठवलं. 

यानंतर महिला रंडेर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतरही तात्काळ कारवाई केली नाही असा आरोप महिलेने केला आहे. पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने सूरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची सविस्तर माहिती दिली. सतीश शर्मा यांनी तपास करण्याचा आदेश देताच पोलिसांनी नगरसेवकाचे पुतणे मोनील कहर, मयक कहर आणि अंकित यांना अटक केली आहे. 

नगरसेवक प्रवीण कहर अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आय के चौहान यांनी दिली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला असून, लवकरच अटक केली जाईल असं सांगितलं आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.