हरिष गुप्ता/शीलेश शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सोमवारी सर्वांनाच धक्का दिला. दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाने कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.
रालोआचा उमेदवार २३ जून रोजी ठरणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपाच्या संसदीय बोर्डाने कोविंद यांच्या नावावर आजच शिक्कामोर्तब केले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषण केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोविंद यांना फोन करून त्यांचे अभिनंदनही केले.भाजपाच्या पद्धतीबाबत विरोधकांनी नापसंती व्यक्त केली. सहमती एकतर्फी होत नाही, असे येचुरी म्हणाले. भाजपाने सहमतीचे नाटक केले, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनीही केली.

शिवसेनेची नाराजी, आज निर्णय
केवळ दलित समाजाची मते मिळविण्यासाठी जर दलित उमेदवार दिला जात असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी शिवसेनेला मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्या शिवसेना नेत्यांची बैठक आयोजित केली असून, त्यात आपली भूमिका ठरवली जाईल, असेही उद्धव म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी केले फोन
पंतप्रधानांनी चंद्रबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, के. चंद्रशेखर राव, नितीश कुमार, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी यांना या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही पक्षाचा निर्णय फोनवरून सांगितला. नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री असल्याने त्यांना हा निर्णय सांगणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांना अमित शहा यांनी फोन केला.

विरोधकांची बैठक २२ जूनला
मोदी यांच्या फोननंतर सोनिया गांधी यांनी लगेचच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आणि त्यांना कोविंद यांच्या उमेदवारीची माहिती दिली. त्यानंतर, त्यांनी लालुप्रसाद यादव, नितीश कुमार, सीताराम येचुरी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्या सर्वांची बैठक २२ जून रोजी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात सहभागी होणार आहे.

आनंद, पण...
राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर होणे ही व्यक्तिश: माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, हे मी आताच सांगू शकत नाही. (बिहारचे) राज्यपाल म्हणून कोविंद यांनी निष्पक्षतेने अनुकरणीय काम केले आहे. त्यांनी राज्य सरकारशी आदर्शवत संबंध ठेवले आहेत.
-नितीश कुमार,
मुख्यमंत्री बिहार
सकारात्मक, पण..!
रामनाथ कोविंद दलित आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे, परंतु रालोआने एखाद्या अराजकीय दलित व्यक्तीला उमेदवारी दिली असती, तर (अधिक) चांगले झाले असते. आता विरोधी पक्षही एखाद्या राजकीय दलित नेत्याचे नाव जाहीर करणार नाही, अशी आशा आहे.
- मायावती, अध्यक्ष, बसपा