शीलेश शर्मा
नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना काळा दिवस पाळत, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आदी शहरांत मोर्चे, धरणे, निदर्शने, मेळावे आदींचे आयोजन केले आणि आपला विरोध व्यक्त केला. महाराष्ट्रात काँग्रेसने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध केले आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुंडनही केले. भाजपाचे मंत्री व मुख्यमंत्री यांनी सर्व शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या निमित्ताने काँग्रेसवर हल्ला चढवला.
भाजपाने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे जाहीर केले होते, पण पत्रकार परिषदा वगळता कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीत. मुंबईत नितीन गडकरी तर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये नोटाबंदीचे समर्थन केले. मंत्र्यांनी काय बोलावे, याचा मसुदाच पंतप्रधान कार्यालयातर्फे तयार करण्यात आला होता की काय, असे मंत्र्याच्या विधानांमुळे जाणवत होते.

वर्षपूर्तीला संदेश नाही
नोटाबंदीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टीव्ही व रेडिओवरून जनतेला संदेश देतील, ही अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. पंतप्रधान कार्यालयाने सकाळी नोटाबंदीसंबंधी एक शॉर्ट फिल्म जारी केली. कर्जावरील व्याजदर घटला, स्थानिक संस्थांचा महसूल वाढला, घरांच्या, तसेच मालमत्तांच्या किमती कमी झाल्या, असा दावा पीएमओने केला. तसेच मोदी यांनी अ‍ॅपद्वारे नोटाबंदीवर जनतेला आपले मत मागितले आहे.

३९६ कोटींचा
काळा पैसा उघड
सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर, नोटा बदलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या ८४ गुन्ह्यांत सीबीआयने ३९६ कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला. सीबीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.

नोटाबंदी ही शोकांतिका : राहुल गांधी
याउलट काळा दिवस पाळणाºया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे आर्थिक सामर्थ्य कमी झाले, बेरोजगारी वाढली, उद्योग बंद पडले, त्यातून जातीय विद्वेषाचे वातावरण वाढत गेले, अशी टीका केली. नोटाबंदी ही शोकांतिका होती, मोदींच्या अविचारी कृत्यामुळे लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला, असा आरोपही त्यांनी केला.

लक्षावधी लोकांची झाली फरपट
काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी नोटाबंदीमुळे लक्षावधी लोकांची फरपट झाली, अशी टीका केली. ते म्हणाले की चलनातील रोख रक्कम कृत्रिमपणे कमी केल्याने बाजारातील मागणी घसरली आणि वाढ घटली. हा निर्णय काळा होता, असेच सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

सर्वच विरोधी पक्ष आंदोलनामध्ये
युवक काँग्रेसने नोटाबंदीचा निषेध म्हणून गेल्या वर्षी बँकांपुढे जशा रांगा लागल्या होत्या, तशा रांगा दिल्लीत लावल्या. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. काँग्रेसबरोबरच तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनीही नोटाबंदीचा निषेध केला. त्यांच्या पक्षांनी, तसेच भाकप, माकप, सपा, संयुक्त जनता दल (शरद यादव गट), बसपा यांनीही ठिकठिकाणी आंदोलने केली.