Bhaiyyuji Maharaj suicide: आध्यामिक व सामाजिक कार्यातून भय्यूजी महाराजांनी घेतली होती ‘निवृत्ती’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 04:00 PM2018-06-12T16:00:39+5:302018-06-12T16:01:50+5:30

भय्यूजी महाराज यांनी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

Bhaiyyuji Maharaj suicide: Due to spiritual and social work, Bhayyaji Maharaj had taken 'voluntary' | Bhaiyyuji Maharaj suicide: आध्यामिक व सामाजिक कार्यातून भय्यूजी महाराजांनी घेतली होती ‘निवृत्ती’

Bhaiyyuji Maharaj suicide: आध्यामिक व सामाजिक कार्यातून भय्यूजी महाराजांनी घेतली होती ‘निवृत्ती’

Next

नवी दिल्ली- सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून स्वत: भोवती भक्तांचे मोठे जाळे निर्माण केलेले आणि अनेक बड्या राजकीय नेत्यांचे गुरू असलेले इंदुर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यूजी महाराज यांनी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

या अनपेक्षित निर्णयामुळे त्यांच्या भक्तांना धक्का बसला होता. पत्रकार परिषदेतच काही भक्तांनी त्याला जोरदार आक्षेप घेत निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले होते. आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती स्वीकारणे म्हणजे विरक्ती नव्हे, नैराश्यही नाही. माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी काही करण्याची ताकद आता माझ्यात राहिलेली नाही, त्यांच्यासाठी यापुढे काही करू शकणार नाही म्हणूनच आपण हा निर्णय घेतल्याचे भय्यूजी महाराज यांनी सांगितले होते.

एकेका महाराजांकडे हजारो कोटींचा निधी आहे, पण दुसरीकडे सामाजिक कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या महाराजाकडे पैसा नाही. स्वत: जवळचे पैसे लावून तरी किती काळ काम करणार, हा प्रश्न आहे. माझ्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे माझ्यासारख्याला कामे थांबवावी लागत आहेत, असेही ते म्हणाले होते. लोकांची दु:खं जवळून पाहतो त्यावेळी मन उद्दिग्न होते. मनात इच्छा असूनही त्यांची दु:खे सोडवू शकलो नाही. कसं जगायचं लोकांनी? असा प्रश्न उपस्थित करत त्यावेळी भय्यू महाराज भावनिक झाले होते. क्षणभर बोलायचे ते थांबले. त्यांना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या.
शेती करण्याचा होता निर्धार 
आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतल्यानंतर आता पुढे काय करणार, असे विचारले असता, भय्यूजी महाराज यांनी यापुढे शेती करणार असल्याचे सांगितले. माझी पत्नी देवाघरी गेली. आई आजारी असते. मुलीकडे लक्ष द्यायचे आहे. घरची शेती करायची आहे. थोडे चिंतन, मनन करणार आहे. पुस्तके सुद्धा लिहायची आहेत, असंही त्यावेळी ते म्हणाले होते.  
नऊ दिवस झोपलो नाही
आध्यात्मिक कार्यातून निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी तब्बल नऊ दिवस मला झोप लागली नाही. सतत नऊ दिवस रात्रभर मी विचार करत होतो. आपली ज्यांना गरज आहे, त्यांना जर मी मदत करू शकणार नसेन तर मग या क्षेत्रात कशाला काम करायचे, हा प्रश्न मला भेडसावत होता. माझ्यातील काम करण्याची ताकद संपली आहे याची जाणीव झाली म्हणूनच मी या क्षेत्रातून निवृत्ती घेत आहे, असेही भय्यू महाराज यांनी सांगितले होते.

Web Title: Bhaiyyuji Maharaj suicide: Due to spiritual and social work, Bhayyaji Maharaj had taken 'voluntary'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.