भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अद्यापही शहीदाचा दर्जा नाही, सरकारी पुस्तकात दहशतवादी म्हणून उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 01:01 PM2017-12-07T13:01:33+5:302017-12-07T13:10:16+5:30

अद्यापही भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीदाचा दर्जा देण्यात आलेला नाही. एका आरटीआयमधून हा खुलासा झाला आहे.  भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे हे आरटीआय करण्यात आलं होतं.

Bhagat Singh, Sukhdev and Rajguru are still not martyred, mention in the government book as a terrorist | भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अद्यापही शहीदाचा दर्जा नाही, सरकारी पुस्तकात दहशतवादी म्हणून उल्लेख

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अद्यापही शहीदाचा दर्जा नाही, सरकारी पुस्तकात दहशतवादी म्हणून उल्लेख

Next
ठळक मुद्देअद्यापही भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीदाचा दर्जा देण्यात आलेला नाहीभारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे करण्यात आलेल्या आरटीआयमधून खुलासानोव्हेंबर महिन्यात रिलीज करण्यात आलेल्या एका पुस्तकात तिघांचाही दहशतवादी म्हणून उल्लेख

नवी दिल्ली - भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेले शहीद भगत सिंग, सुखदेव व राजगुरू आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. मात्र भारत सरकारने अद्यापही त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं समोर आलं आहे. अद्यापही भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीदाचा दर्जा देण्यात आलेला नाही. एका आरटीआयमधून हा खुलासा झाला आहे.  भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे हे आरटीआय करण्यात आलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडून नोव्हेंबर महिन्यात रिलीज करण्यात आलेल्या एका पुस्तकात तिघांचाही दहशतवादी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय इतिहास संशोधन परिषद विभाग मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. सोबतच चेअरमनची निवडही सरकारकडूनच केली जाते. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, मागील सरकार सतत या तिन्ही शहीदांकडे दुर्लक्ष करत होती.  जम्मूमधील रोहित चौधरी यांनी हे आरटीआय दाखल केलं होतं. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

भगत सिंग यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख झाल्याने वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी दिल्ली विश्वविद्यालयाने इतिहासाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट एका पुस्तकात भगत सिंग यांना क्रांतिकारी दहशतवादी म्हणून उल्लेख केला होता. वाद झाल्यानंतर या पुस्तकाची विक्री थांबवण्यात आली होती.  मृदुला मुखर्जी आणि विपीन चंद्रा यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडेंस’ नावाच्या या पुस्तकात ही घोडचूक करण्यात आली होती.
भगतसिंग यांच्यासोबतच चंद्रशेखर आझाद, सूर्य सेना आणि अन्य लोक हे ‘क्रांतिकारी दहशतवादी’ होते, असे या पुस्तकात म्हटले होते. या पुस्तकात चित्तगाव आंदोलन आणि सँडर्स हत्याकांडाला ‘दहशतवादी कृत्य’ संबोधण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर अनेक लेखक आणि इतिहासकारांनी पुस्तकातील हा संदर्भ हटविण्याची जोरदार मागणी केली होती. 

भगतसिंग -
भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. 

लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. 
 
राजगुरु - 
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 
 
सुखदेव - 
सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूरमध्ये दि.१५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.

Web Title: Bhagat Singh, Sukhdev and Rajguru are still not martyred, mention in the government book as a terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Martyrशहीद