'Beti Rescue' will be forwarded to mother-in-law | ‘बेटी बचाव’साठी सासूूंनीच यावे पुढे

- अनुभा जैन
झुनझुनू (राजस्थान) - स्त्रीभ्रूणहत्या हा समाजासाठी लज्जास्पद प्रकार आहे, असे स्पष्ट करतानाच ‘बेटी बचाव’साठी आता सासूंनीच पुढाकार घ्यावा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
राजस्थानात राष्ट्रीय पोषण मिशनचा शुभारंभ व ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ मोहिमेच्या विस्तार कार्यक्रमात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, सर्व जण समान आहेत. मुलांप्रमाणे मुलीही शिक्षणात आघाडीवर आहेत. एक मुलगी ओझे असू शकत नाही. देशाने गर्व करावा असे काम महिलांनी केले आहे. त्यामुळे मुलामुलींना समान वागणूक द्यावी. मुलगी ही ओझे नाही; तर पूर्ण कुटुंबाची आन, बान आणि शान आहे. मुलांना योग्य पोषण आहार देणे गरजेचे आहे.
या वेळी महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपस्थिती होती. देशातील बालविवाहांचे प्रमाण ४७ टक्क्यांहून २० टक्क्यांवर आल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले.

कुंवरबार्इंची आठवण : नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ योजनेच्या प्रतीक असलेल्या छत्तीसगडच्या कुंवरबाई यांची आठवण काढत त्यांना आदरांजली अर्पण केली. कुंवरबार्इंनी घरात शौचालय बांधण्यासाठी आपली एकमेव संपत्ती म्हणजेच शेळ्यांची विक्री केली.

६४० जिल्ह्यांत विस्तार : मुलींसाठी समानतेचे वातावरण तयार करा आणि मुलामुलींतील भेदभाव संपवा. मुलांसाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे. ‘मिशन इंद्रधनुष’, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून महिला आणि मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ कार्यक्रमाचा १६१वरून ६४० जिल्ह्यांत विस्तार करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले.


Web Title:  'Beti Rescue' will be forwarded to mother-in-law
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.