Beef sales start, crowd gathered | बीफ विक्री सुरू, खरेदीला गर्दी

पणजी : बेकायदेशीररित्या बिफ पकडले गेल्यानंतर राजधानीतील एक आठवडा बंद ठेवलेली दुकाने बिफ विक्रेत्यांनी कालपासून (शनिवारी) सुरू केली. रविवारी वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बिफ खरेदीला लोकांची मोठी गर्दी दिसत होती. गेल्या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी बेळगावहून बेकायदेशीररीत्या गोव्यात आणले जाणारे 130 किलो बिफ पकडले गेल्यानंतर राजधानीतील बीफ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. सुमारे बारा लाख रुपयांचे हे मांस होते. ज्या बोलेरोतून हे बिफ आणले जात होते, त्या बोलेरोला पाटो येथे रात्री अपघात झाल्यानंतर ही बाब पुढे आली.

हॉर्मोनी पशुसंवर्धन संस्थेच्या अधिका-यांनी या बीफची तपसाणी केल्यानंतर त्या वाहनचालकाकडे कत्तलखान्याचे अधिकृत प्रमाणपत्र, डॉक्टरांचे प्रमाणपत्र वगैरे काही सापडले नव्हते. त्यामुळे गोव्यात बेकायदेशीररीत्या बीफची वाहतूक होत असल्याचे त्या संस्थेच्या अधिका-यांना आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून चालकाला ताब्यात दिले.

या कारवाईमुळे बेळगावच्या व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. बीफ विक्रीचा एका दुकानाचा व्यवसाय किमान 25 ते 30 हजार रुपयांचा असून, आठवडाभर दुकाने बंद ठेवली गेल्याने या लोकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. येथील काही व्यापा-यांनी कर्नाटकच्या पशुसंवर्धन खात्याच्या संचालकांची भेट घेऊन सुरक्षित बीफ पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला जाईल, असेही सांगितले आहे. दरम्यान, वर्षाचा आज शेवटचा दिवस असल्याने त्यातच नाताळाच्या सुट्ट्याही सुरू आहेत, याचे औचित्य साधून ख्रिश्चन बांधवांकडून बिफची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी बेळगावहून बाजारात नेहमीप्रमाणे बीफ दाखल झाले आहे.