गाझियाबाद - 24 तास पेट्रोलिंग करत शहरात कडक सुरक्षाव्यवस्था असल्याचा पोलिसांचा दावा रविवारी फोल ठरला. गोविंदपुरमसारख्या पॉश परिसरात चोराने एकाच रात्रीत 80 गाड्यांची बॅटरी चोरी केली आणि पोलिसांना साधा याचा सुगावाही लागला नाही. सोमवारी सकाळी जेव्हा लोकांच्या लक्षात आलं, तेव्हा एकच गोंधळ उडाला. चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. एका सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून, कारमधून आलेले चोर बोनेट खोलून बोनेट चोरी करताना दिसत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

पोलीस अधिकारी समरजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच याआधी कारची बॅटरी चोरी प्रकरणात अटक झालेल्या चोरांची माहितीही तपासली जात आहे. एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी गोविंदपुरम जी ब्लॉकच्या गल्ली क्रमांक 2,3,4, 5 सहित अन्य परिसरांमध्ये झाली आहे. सर्वात जास्त बॅट-यांची चोरी दोन नंबरच्या गल्लीत झाली आहे. येथून चोरांनी जवळपास 20 कारमधून बॅटरी चोरुन नेली आहे. ज्या कारमधून बॅटरी चोरी झाल्या आहेत, त्यामधील 80 टक्के कार मारुतीच्या आहेत अशी माहिती लोकांनी दिली आहे. 

कॅमे-यात कैद झाले चोर 
येथे लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्हीत चोरी कैद झाली आहे. सीसीटीव्हीत चोर एका स्विफ्ट कारमधून रात्री जवळपास दोन वाजता गोविंदपुरम येथे पोहोचल्याचं दिसत आहे. कारमधून उतरल्यानंतर चोरांनी कारचं बोनेट खोलून त्यातून बॅटरी काढली. पोलिसांकडे फक्त एकाच ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बॅटरी चोरी करण्यासाठी चोरांनी मोठ्या गाडीचा वापर केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी पोलीस इतर ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. 

500 ते 1000 रुपयांत विकली जाते बॅटरी
याआधी अटक करण्यात आलेल्या चोरांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की, कारच्या बॅटरी दिल्ली आणि मेरठ मार्केटमध्ये विकल्या जातात. 500 ते 1000 रुपयांमध्ये या बॅट-या विकत घेतल्या जातात.