महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 09:45 PM2019-07-13T21:45:46+5:302019-07-14T06:27:16+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्वात बदल केला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

Balasaheb Thorat in New Maharashtra Pradesh Congress president | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

Next

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. थोरात यांच्याकडे निवडणूक व रणनीती समितीची सूत्रेही सोपविली आहेत तर के. सी. पाडवी यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद देण्यात आले आहे. थोरात यांच्यासमवेत नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली नकोत, असा त्यांचा आग्रह होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा थोरात यांच्याकडे सोपविली आहे.

मात्र हे करताना आणखी पाच कार्याध्यक्षांचे मंडळ तयार केले आहे. त्यात राजकीय समीकरणेही साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षनेते विरोधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपची वाट स्वीकारली. त्यानंतर नगर जिल्ह्यातूनच प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात यांची नेमणूक करून पक्षाने नगर जिल्ह्याला महत्त्व दिले आहे. हर्षवर्धन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती. विदभार्तून विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर आता पक्षाने नितीन राऊत यांना कार्याध्यक्ष करून विदर्भात आणखी एक महत्त्वाचे पद देऊ केले आहे. त्यासोबतच यशोमती ठाकूर यांच्या रूपाने एका महिला नेत्यालाही जबाबदारी दिली आहे. गेले काही वर्षे पक्षापासून दूर असलेल्या मुजफ्फर हुसेन यांनाही पक्षाने जबाबदारी देत मुस्लिम समाजातही आपली छबी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच पक्षाने अशोक चव्हाण यांना ‘स्ट्रॅटेजी कमिटी’चे सह-अध्यक्ष केले आहे. हर्षवर्धन पाटील यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय या समितीत मिलिंद देवरा, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुनील केदार, शरद रणपिसे, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, जयवंतराव आवळे, नाना पटोले, नसीम खान आणि रामहरी रुपनवर यांचाही ‘स्ट्रॅटेजी कमिटी’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

इतर समित्या व त्यांचे अध्यक्ष
समन्वय समिती : सुशीलकुमार शिंदे
जाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाण
माध्यम व संवाद समिती : राजेंद्र दर्डा
प्रचार समिती : नाना पटोले
प्रसिद्धी - प्रकाशन समिती : रत्नाकर महाजन
निवडणूक व्यवस्थापन समिती : शरद रणपिसे

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली होती.  तेव्हापासूनच बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

 

Web Title: Balasaheb Thorat in New Maharashtra Pradesh Congress president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.