‘तिरुवनंतपूरम’मध्ये शशी थरूर यांना घेरण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:51 AM2019-03-18T05:51:41+5:302019-03-18T05:52:02+5:30

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे.

 Attempts to encircle Shashi Tharoor in Thiruvananthapuram | ‘तिरुवनंतपूरम’मध्ये शशी थरूर यांना घेरण्याचे प्रयत्न

‘तिरुवनंतपूरम’मध्ये शशी थरूर यांना घेरण्याचे प्रयत्न

Next

- पोपट पवार

तिरुवनंतपूरम : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे. एलडीएफप्रणित भाकपने आमदार सी. दिवाकरन यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. भाजपाने शशी थरूर यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक नावांची चाचपणी सुरू केली आहे. मिझोरमच्या राज्यपालपदाचा नुकताच राजीनामा देणारे कुम्मानम राजशेखरन यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीच राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी तिरूवनंतपूरममधून सलग दोनदा विजयी झालेल्या थरूर यांना यंदा 'हॅटट्रिक' करण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसने केरळ लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. मात्र राष्ट्रीय राजकारणात स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या उच्चशिक्षित शशी थरुर यांची तिरूवनंतपूरममधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
तिरूवनंतपूरम हा केरळमधील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तिरूवनंतपूरम मतदारसंघ १९७१ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे झालेल्या लोकसभेच्या ११ पैकी तब्बल ७ निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) ४ वेळा विजय मिळवला. केरळची राजधानी असलेल्या तिरूवनंतपूरमध्ये गेल्या तीन दशकांहून डावे आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष नेहमीच अटातटीचा राहिला आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने येथे काँग्रेसला निकराची लढत दिली. त्यामुळे भाजपालाही हा मतदारसंघ महत्त्वाचा बनला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शशी थरूर यांनी भाजपच्या ओ. राजगोपाल यांच्यावर अवघ्या १५ हजार ४७० मतांनी विजय मिळविला होता. थरूर यांना २ लाख ९७ हजार ८०६ मते, तर कडवी झुंज देणा-या राजगोपाल यांना २ लाख ८२ हजार ३३६ मते मिळाली होती. याच निवडणुकीत बेनेट अब्राहम यांनीही अडीच लाख मते घेत तिरूवनंतपूरम मतदारसंघात सीपीआयचे स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले होते.

त्याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिरूवनंतपूरममधून सीपीआयच्या उमेदवाराचा तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करणाºया थरूर यांचे २०१४ च्या निवडणुकीत मताधिक्य घटल्याने काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरली आहे. याचाच लाभ उठवण्यासाठी भाजपासह डाव्या पक्षांनीही थरूर यांना खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गेल्या निवडणुकीत दुसºया स्थानाची मते मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाची ‘हवा’ करून, थरूर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरून संमती न मिळाल्याने भाजपाने मिझोरामचे राज्यपाल कुम्मानम राजशेखरन यांनाच आखाड्यात उतरवण्याची तयारी चालविली आहे. राजशेखरन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांच्या जनसंपर्काचा फायदा थरूर यांना पराभूत करण्यात हातभार लावेल, असा भाजपाचा व्होरा आहे.

भाकपमुळे इतरांना डोकेदुखी

गेल्या निवडणुकीत तिरूवनंतपूरममध्ये तिसºया स्थानाची मते घेणाºया भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) विद्यमान आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सी. दिवाकरन यांनाच मैदानात उतरवल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिवाकरन हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची उमेदवारी काँग्रेसह भाजपलाही डोकेदुखी ठरणार आहे.

Web Title:  Attempts to encircle Shashi Tharoor in Thiruvananthapuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.