लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:11 AM2019-03-11T05:11:59+5:302019-03-11T05:12:42+5:30

मात्र जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती प्रतिकूल

Assembly elections in Andhra, Odisha, Arunachal and Sikkim along with Loksabha | लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

Next

नवी दिल्ली : लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणचाल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केला.
मात्र, दहशतवादामुळे नाजूक स्थिती असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक न घेण्याचे आयोगाने ठरविले. परिणामी गेल्या जूनपासून लोकनियुक्त सरकार नसलेल्या या अशांत राज्यास त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या चार राज्यांमध्ये ज्या दिवशी लोकसभेसाठी मतदान होईल त्याच दिवशी विधानसभेसाठी मतदान घेतले जाईल. विधानसभांचे निकालही लोकसभेसोबतच २३ मे रोजी जाहीर होतील.

आंध्र प्रदेश
दक्षिणेकडील या राज्यात लोकसभेच्या सर्व २५ जागा व विधानसभेच्या १७५जागांसाठी ११ एप्रिल या एकाच दिवशी मतदान होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत तेलगु देसम व भाजपा आघाडीने १७६ पैकी १२६ जागा जिंकून मोठे यश ंसंपादित केले होते. मात्र, आता तेलगु देसम ‘रालोआ’मधून बाहेर पडल्याने या वेळी चित्र वेगळे असेल. गेल्या निवडणुकीतही तेदप-भाजपा आघाडी व विरोधक यांच्या मतांच्या टक्क्यात ०.२ टक्का एवढा निसटता फरक होता. वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी ३,६४८ किमीच्या पदयात्रेनंतर अधिक बळकट झाले आहेत. तेलगु देसमला सरकारविरोधी भावनेला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे आंध्रमधील निवडणूक चुरशीची होणे अपेक्षित आहे.

ओडिशा
या पूर्वेकडील राज्यात ११, १८, २३ व २९ एप्रिल अशा चार टप्प्यांत लोकसभा व विधानसभेचे मतदान होईल. येथे विधानसभेच्या १४७ व लोकसभेच्या २१ जागा आहेत सलग १९ वर्षे सत्तेवर असलेले बिजू जनता दल व त्यांचे प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना सरकारविरोधी जनभावना व नव्या उमेदीने कामाला लागलेली भाजपा व काँग्रेस या विरोधकांचा सामना करावा लागेल. गेल्या निवडणुकीत बिजदने लोकसभेच्या २० व विधानसभेच्या ११७ जागा जिंकल्या होत्या. ३३ टक्के मतदारसंघांत महिला उमेदवार उभे करण्याचा बिजदाचा निर्णयही इतरांपुढे नवे आव्हान उभे करू शकेल.

सिक्किम
ईशान्येकडील या राज्यात लोकसभेची एक तर विधानसभेच्या ४० जागा आहेत. मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) सलग सहाव्या वेळेला सत्तेवर येते का, हे या निवडणुकीचे मुख्य आकर्षण असेल. गेल्या निवडणुकीत ‘एसडीएफ’ने ४०पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने स्थापन केलेल्या नॉर्थइस्ट डेमोक्रॅटिक अ‍ॅलायन्सचा घटक असूनही ‘एसडीएफ’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सरकारकडून किमान उत्पन्न म्हणून काही ठराविक रक्कम दरमहा देण्याची देशातील पहिली योजना राबविण्याच्या घोषणेचे ‘एसडीएफ’ला किती फायदा होतो, हे पाहणेही लक्षणीय ठरेल. येथे ११ एप्रिल रोजी मतदान होईल.

अरुणाचल प्रदेश
चीनच्या सीमेला लागून असलेल्या या ईशान्येकडील राज्यात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या ६० जागा आहेत. या दोन्हींचे मतदान ११ एप्रिल रोजी होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेस सत्तेवर आली होती. परंतु बहुसंख्य आमदार फुटून भाजपामध्ये गेल्याने त्या पक्षाचे पेमा खांडू मुख्यमंत्री झाले. परंतु गेल्या डिसेंबरपासून पक्ष सोडून गेलेले बरेच जण पुन्हा काँग्रेसकडे आले आहेत. या आयाराम गयारामांच्या राजकारणाचे निवडणुकीत कसे पतिबिंब पडते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Assembly elections in Andhra, Odisha, Arunachal and Sikkim along with Loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.