'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:11 PM2019-05-27T12:11:23+5:302019-05-27T12:14:42+5:30

गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

Assault on Muslim man: Gautam Gambhir demands action against attackers | 'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला! 

'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला! 

Next
ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या मनातील काल्पनिक भीती काढण्याबाबत नरेंद्र मोदींनी सूतोवाच केलं आहे.गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.'त्यांनी जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली. मी नाही म्हणालो, तेव्हा मला मारहाण केली'

लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची त्सुनामी उसळून भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या विराट विजयाने हवेत जाऊ नका, संयमाने वागा, असा सल्ला खुद्द मोदींनी एनडीए नेता निवडीच्या बैठकीत दिला. अल्पसंख्याकांच्या मनातील काल्पनिक भीती काढण्याबाबतही त्यांनी सूतोवाच केलं. परंतु, स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारी मंडळी 'फिर एक बार... मोदी सरकार'मुळे भलतीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरून, माजी क्रिकेटवीर आणि दिल्लीतील भाजपाचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर याने तीव्र संताप व्यक्त करत हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचा ठणकावलं आहे. 

मशिदीतून परतणाऱ्या मुस्लीम तरुणाला एका जमावाने वाटेत रोखलं, त्याची टोपी काढून घेतली आणि 'जय श्रीराम'चे नारे द्यायला सांगितलं. त्याने नकार दिल्यावर त्याला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. मोहम्मद बरकत आलम (२५) असं या तरुणाचं नाव असून त्यानं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर बाजार गल्लीत हा प्रकार घडला. चार तरुणांनी आधी मला 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलं. त्यानुसार मी म्हटलं सुद्धा. पण मग त्यांनी जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली. मी नाही म्हणालो, तेव्हा मला मारहाण केली, असं आलमनं म्हटलं आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.


ही घटना समजल्यानंतर, खासदार गौतम गंभीरनं आपल्या स्वभावाप्रमाणे 'स्ट्रेट ड्राइव्ह' लगावला आहे. मुस्लीम युवकाची टोपी उतरवून त्याला 'जय श्रीराम' म्हणायला सांगितलं गेलं, हे खेदजनक आहे. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. इथे जावेद अख्तर 'ओ पालन हारे निर्गुण और न्यारे'सारखं आणि राकेश मेहरा 'अर्जियां'सारखं गाणं लिहितात, अशी ट्विप्पणी त्यानं केली आहे.  


लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरनं दिल्ली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. कायमच धर्मनिरपेक्ष मतं मांडणाऱ्या गंभीरनं विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली होती. त्यामुळेच मुस्लीम युवकाला झालेल्या मारहाणीबद्दल त्यानं तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Assault on Muslim man: Gautam Gambhir demands action against attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.