आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 01:47 PM2018-10-17T13:47:23+5:302018-10-17T13:52:24+5:30

मानवेंद्र सिंह आणि आशिष देशमुख यांनी बुधवारी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात दोघांनीही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 

Ashish Deshmukh and Manvendra Singh join Congress | आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह आणि आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मानवेंद्र सिंह आणि आशिष देशमुख यांनी बुधवारी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात दोघांनीही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 

गेल्या काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे महाराष्ट्रातील काटोल येथील आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून 2014 साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. 




राजस्थानमधील भाजपाचे आमदार असलेल्या मानवेंद्र सिंह यांनी गेल्या महिन्यात बारमेरमध्ये झालेल्या 'स्वाभिमान रॅली'दरम्यान आपण भाजपा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना 'कमल का फूल, बडी भूल' असे त्यांनी म्हटले होते. मानवेंद्र सिंह हे 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर बारमेर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.



 

Web Title: Ashish Deshmukh and Manvendra Singh join Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.