नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली वॅगन आर कार  चोरट्यांनी सुटे भाग करून विकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या चोरीस गेलेल्या कारचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मीरत येथे गेले असून, चोरीच्या गाड्यांचे सुटे भाग करून विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सोतीगंज बाजारात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. 
मीरत येथील सोतीगंज बाजार चोरीच्या वाहनांची विक्री आणि सुटे भाग करून विकण्यासाठी बदनाम आहे. या बाजारात दिल्ली आणि एनसीआर भागातून चोरीस गेलेल्या गाड्या विक्रीस आणल्या जातात. केजरीवाल यांच्या गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोतीगंजच्या बाजारात रस्त्यापासून गोदामांपर्यंत तपास केला.  तसेच वेगन आर गाड्यांची थांबवून थांबवून चौकशी केली.  
 नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी गुरुवारी दुपारी चोरीला गेली होती. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला. माध्यमांच्या मिळालेल्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांच्याजवळ असलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) गाडी चोरीला गेली. नवी दिल्लीच्या पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पण त्यामध्ये चोरीचे दृश्य व्यवस्थित दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या गाडीचा वापर करत होते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या गाडीचा सर्वाधिक वापर केला होता. सध्या ते सरकारी गाडीचा वापर करत आहेत.  
परदेशी राहणाऱ्या भारतीयाकडून ही कार केजरीवालांना भेट मिळाली होती. व्हीआयपी कल्चरचा विरोध म्हणून  आम आदमी पक्षाने या निळ्या व्हॅगन आरचा प्रतिकात्मक वापर केला होता. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ध्यान कुठे आहे? हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.