श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही अद्यापही 115 दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती लष्कराने दिली आहे. जवळपास 100 स्थानिक दहशतवादी असून, 15 परदेशी दहशतवादी दबा धरुन लपून बसलेले आहेत. 

गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. पम्पोरजवळील गावात झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव बदर होतं. तो जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता. जनरल ऑफिस कमांडिगने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.


काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत लष्कराने आपला मोर्चा दक्षिण काश्मीरच्या दिशेने वळवला असून, जिहादींचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्लान आखला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचं सांगितलं जातं. तिथे खुलेपणाने दहशतवादी कारवाया सुरु असतात. लष्कराने याठिकाणीही आपली गस्त वाढवली आहे. लष्कराने नवे कॅम्प उभारले असून, सीआरपीएफच्या रिझर्व्ह बटालियनलादेखील तैनात केलं आहे. 

दुसरीकडे, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकाने इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांना जम्मू काश्मीरमधील सर्व पक्षांशी सतत चर्चा करण्यासाठी नियुक्त केलं आहे. 

'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका'
भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं होतं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'.