Army chief suggests new formula to stop Pakistani operations | पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यासाठी लष्करप्रमुखांनी सुचवला नवा फॉर्म्युला

नवी दिल्ली -  दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र त्यासाठी राजकीय पुढाकाराबरोबरच लष्करी अभियानही सुरू राहिले पाहिजे. तसेच सीमापलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाईची गरज असल्याचेही लष्कर प्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे. 

पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीबाबत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. मात्र रविवारी एका विशेष मुलाखतीदरम्यान, लष्करप्रमुखांनी काश्मिरमधील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आणि युद्धनीती विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान,  'पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी म्हणजे केवळ पोकळ धमकी आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ,' असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी आज टि्वटरवरून  'भारताच्या लष्करप्रमुखांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. त्यांचं वक्तव्य अण्वस्त्र हल्लाला आमंत्रण देणारं आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली होती.

 


Web Title: Army chief suggests new formula to stop Pakistani operations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.