आक्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:37 AM2018-02-19T02:37:28+5:302018-02-19T02:39:02+5:30

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली.

Arctic | आक्रित

आक्रित

Next

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. आपले जीवाभावाचे लोक आणि सा-या शहराला दु:खाच्या सागरात लोटून. होत्याचे नव्हते झाले. या मुलांनी अन् त्यांच्या पालकांनीही त्यांच्या भावी आयुष्याची किती सुंदर स्वप्ने रंगविली असतील. त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. असे का घडावे? नियतीपुढे कुणाचे चालत नाही असे म्हणतात. हा अपघातही नियतीचा खेळ असल्याची आपली समजूत करून घेत मुलांच्या या अकाली मरणाचे दु:ख पचवून घेऊ. पण खरंच हा केवळ नियतीचा खेळ होता का? हा अपघात टाळता आला नसता का? असे अनेक प्रश्न या भीषण अपघाताने पुन्हा एकदा निर्माण केले आहेत. आजवरच्या अपघातांवरून हे लक्षात आले आहे की बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असतात. शुक्रवारी दुपारी नागपूर-अमरावती मार्गावर झालेला अपघातही तसाच होता. आठ मित्रमैत्रिणी कार्यक्रमाचे यश साजरे करण्याकरिता निघाले होते. प्रचंड उत्साह होता. परतताना त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून तिचे टायर फुटले अन् ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. अपघाताची वार्ता कळल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. त्यांचा आक्रोश थरकाप उडविणारा होता. अवघ्या काही तासांपूर्वी हसतखेळत घरातून बाहेर पडणाºया आपल्या मुलांचे कलेवरच घरी घेईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मनात एकच विचार येतो; या मुलांनी आपल्या मनावर आणि गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले असते तर आज ते आपल्यात हसतखेळत असते. गेल्यावर्षी असेच विद्यार्थ्यांचे दोन मोठे अपघात नागपूरकरांनी अनुभवले आहेत. अमरावती मार्गावरील कार अपघातात अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. ती कारसुद्धा प्रचंड वेगात होती. भूतकाळात डोकावले आणि या सर्व कार अपघातांवर नजर टाकली तर एक समान गोष्ट लक्षात येत ती म्हणजे गाडीचा वेग आणि वाढते पार्टी कल्चर. विशेषत: अमरावती मार्गावर ढाबे आणि हॉटेल्सची संख्या खूप वाढली आहे. तरुणाई वाढदिवस आणि इतर आनंद साजरा करण्याकरिता शहराबाहेर पडते आणि परत येताना हे अपघात घडतात. कुठलेही संकट सांगून येत नाही. पण काही संकटे आपण स्वत:हूनच ओढवून घेतो हे सुद्धा एक वास्तव आहे.

Web Title: Arctic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात