कोलकाता, दि. 13 - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या  ब्ल्यू व्हेल गेम चॅलेंजने अजून एक बळी घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या ऑनलाइन गेमच्या आहारी जात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी दहावीत शिकत होता. ही घटना पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे घडली आहे. 
मुंबईतील अंधेरी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर भारतात ब्ल्यू व्हेल गेमची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ब्लू व्हेल गेमपायी घर सोडणाऱ्या मुलाला पुणे  पोलिसांनी वाचवले होते. तर इंदूरमध्ये शाळा सुरू असताना  इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याच्या मित्रांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले होते.  
या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याने ब्ल्यू ब्हेल गेमपायी आत्महत्या केली आहे. या ऑनलाइमन गेममधील स्टेप पूर्ण करताना मिळालेल्या सूचनेनुसार या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. 
सोशल मीडिया माध्यमातून ‘ब्ल्यू व्हेल’ गेमबद्दलची चर्चा गाजत असताना बुधवारी जुळे सोलापुरातील १४ वर्षांचा मुलगा यात अडकल्याचे उघडकीस आले. सोलापूर ग्रामीण पोलील दलातील अमोल यादव, भिगवण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने हा मुलगा सुखरुप त्यांच्या आई-बाबांना मिळाला; मात्र तमाम पालक हादरले आहेत. पोलीस प्रशासनानेही तातडीने या गेमचे गांभीर्य ओळखून शहर आणि जिल्ह्यात शाळांमध्ये मुलांमध्ये जनजागरण करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश देण्यात आले आहेत. 
 ब्ल्यू व्हेल या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. यात दररोज एक याप्रमाणे ५० दिवस काही काम करण्यास सांगितले जाते. जसे की आज रात्री बारा वाजता उठा, उद्या सकाळी अमुक टेकडी चढा, परवा काय तर अमुक हॉरर चित्रपट बघा, अशी कामे दररोज करण्यास सांगितले जाते. अखेर शेवटच्या दिवशी सहभागींना आत्महत्या करण्याचे आवाहन गेमद्वारे केले जाते. त्यानुसार जगभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.