ठळक मुद्देरायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे. पंजाबमधील जमालपूर इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका चौथीच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन शिक्षकांनी मिळून या मुलाला बेदम मारहाण केली.

नवी दिल्ली-  गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं प्रकरण ताज असतानाचा रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे. पंजाबमधील जमालपूर इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका चौथीच्या मुलाला अमानुष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन शिक्षकांनी मिळून या मुलाला अमानुष मारहाण केली. काही दिवसांपूर्वी गुरूग्रामधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी तसंच पालक दोघंही चिंतेत आहेत. यासाठी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर पालकांनी आंदोलनही केलं होतं. रायनमधील या घटनेमुळे मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. 


पण शाळेतमध्ये मुलाला मारहाण केल्याचे आरोप पंजाबच्या रायन इंटरनॅशनल स्कूलने फेटाळून लावले आहेत. मारहाण झालेल्या मुलाला बुधवारी त्याच्या बेशिस्त वागणुकीमुळे एक महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याने शाळेकडून हे पाऊलं उचललं असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे. 
तर दुसरीकडे शाळेतील शिक्षकांनी मुलाला बेदम मारल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. शाळेत काही मुलं एकमेकांशी भांडत असल्याने शिक्षकांनी मारहाण केली. शाळेच्या बाजूला असणाऱ्या हाय टेंशन वायर्सबद्दल मी तक्रार केली होती, म्हणूनच माझ्या मुलाला शाळेतील शिक्षकांकडून मारहाण झाली, असा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. 
दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पुढचा तपास सुरू झाला आहे. आमच्याकडे तक्रार आली असून या प्रकरणी तात्काळ कारवाई केली जाणार आहे. आम्हाला त्या मुलाचे मेडीकल रिपोर्ट मिळाले असल्याचं जमालपूर पोलिसांनी सांगितलं आहे. 

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाली विद्यार्थ्याची हत्या
गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय मुलगा प्रद्युम्न ठाकूरची गला चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर रायन इंटरनॅशनल स्कूल जास्त चर्चेत आली. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं आहे. 

रायन इंटरनॅशनल ग्रुपच्या तिन्ही विश्वस्तांच्या अटकेला न्यायालयानं दिली स्थगिती 
हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठानं पिंटो परिवाराला जामीन मंजूर केला आहे.रायन इंटरनॅशनल शाळेचे संचालक ऑगस्टिन पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यांनी 16 सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी याचिका अर्ज केला होता.