एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल झालाय, सय्यद सलाहुद्दीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 04:59 PM2018-01-09T16:59:56+5:302018-01-09T17:04:14+5:30

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी मन्नान वानी हा कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा, हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या  सय्यद सलाहुद्दीन याने केला आहे.

AMU student Mannan Wani has joined Hizbul Mujahideen, claims Sayed Salahuddin | एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल झालाय, सय्यद सलाहुद्दीनचा दावा

एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल झालाय, सय्यद सलाहुद्दीनचा दावा

Next

श्रीनगर - अलिगड मुस्लिम विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी मन्नान वानी हा कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा, हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या  सय्यद सलाहुद्दीन याने केला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांना एक पत्रक पाठवून सलाहुद्दीनने हा दावा केला आहे. मन्नान वानी हा अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये पीएचडी करत होता. 
सलाहुद्दीनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, "मन्नान वानीच्या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यामुळे गरिबी आणि बेरोजगारीमुळे काश्मिरी तरुण दहशतवादाचा मार्ग पत्करत असल्याचा भारताचा दावा फोल ठरला आहे." सलाहुद्दीनचे हे वक्तव्य उर्दू भाषेत प्रसारित करण्यात आले आहे. त्यात तो म्हणतो की, काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुशिक्षित आणि पात्र काश्मिरी तरुण हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल होत आहेत. युवकांकडून दाखवण्यात येत असलेले हे धाडस कौतुकास्पद आहे.   
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. 
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे.  ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाड्यात व्हायरल झाला होता. व्हॉट्स अॅप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून, त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं आहे. बशीर अहमद वानी असं मन्नानच्या वडिलांचं नाव असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राहतात. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हासुद्धा इंजिनिअर आहे.  
‘मन्नानचा फोटो आम्ही पाहिला. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मन्नान हरविल्याची तक्रार दाखल केली होती’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हटले होते. 
 विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा 'स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर' या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतले होते.

Web Title: AMU student Mannan Wani has joined Hizbul Mujahideen, claims Sayed Salahuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.