छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2018 10:52 AM2018-11-16T10:52:14+5:302018-11-16T10:54:33+5:30

छत्तीसगडमधील काही भागात जोगी-मायावतींच्या आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, तिरंगी लढतीत कुणालीही बहुमत न मिळाल्यास अजित जोगींकडे किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे. 

Ajit Jogis will be chance to become kingmaker in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

Next

 सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि अजित जोगी आणि मायावतींच्या पक्षांची आघाडी अशी तिरंगी लढत होत असल्याने यावेळी छत्तीसगडमधील विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे. एकीकडे रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने सलग चौथ्यांना राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसला  भाजपासोबतच अजित जोगी आणि बसपा यांच्यात झालेल्या आघाडीच्या आव्हानाचाही सामना करावा लागत आहे. त्यातच राज्यातील काही भागात जोगी-मायावतींच्या आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने भाजपा आणि काँग्रेसची चिंता वाढली असून,  तिरंगी लढतीत कुणालीही बहुमत न मिळाल्यास अजित जोगींकडे किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे. 

 मुळचे काँग्रेसी असलेल्या अजित जोगींमुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपाला होईल, त्यामुळे राज्यात रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बहुमतासह सहज विजय मिळवेल, असे ढोबळ विश्लेषण केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या अजित जोगी यांनी काही भागात काँग्रेसच्या मतपेढीला सुरूंग लावला आहेच. सोबतच भाजपासमोरही आव्हान उभे केले आहे.

राज्यात एससी-एसटीसाठी आरक्षित असलेल्या 39 जागांवर जोगी आणि मायावतींचा आघाडी प्रभावी ठरू शकते. गेल्यावेळी या जागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपाने विजय मिळवला होता. मात्र यावेळी तिरंगी लढतीमुळे चुरस अधिकच वाढली आहे. आता या ठिकाणी जोगी-मायावती फॅक्टर चालल्यास काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही निश्चितपणे फटका बसणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाने मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचा चेहरा समोर ठेवून प्रचार अभियान चालवले आहे. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसकडे रमण सिंह यांच्या तोडीचा नेता नसल्याने ही बाब भाजपासाठी जमेची बाजू ठरत आहे, मात्र 15 वर्षांपासून सत्ता असल्याने असलेली अँटी इन्कम्बन्सी, धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी, बेरोजगारी यामुळे सत्ताधारी भाजपाविरोधात नाराजी आहे. 

एकीकडे भाजपा आणि काँग्रेसकडून जोगी-मायावती आघाडी ही एकमेकांची बी टीम असल्याचा आरोप होत आहे. मात्र या दोन्ही पक्षांनीही या आघाडीचा धसका घेतला आहे हे निश्चित आहे. त्यामुळे उर्वारित 72 जागांसाठी होणाऱ्या मतदानामामध्ये जोगी आणि मायावतींचा पक्ष कशी कामगिरी करतात, त्यावर छत्तीसगड विधानसभेत कोण बाजी मारणार हे अवलंबून असेल. तसेच जर छत्तीसगडमध्ये कर्नाटकप्रमाणेच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, तर सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवून किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी जोगी-आणि मायावतींना असेल.  

Web Title: Ajit Jogis will be chance to become kingmaker in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.