लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बँकेत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.
आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे. करातून पळवाट काढण्यासाठी लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर ६० देणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकेत खाते सुरु करताना जर आधार क्रमांक नसेल तर अर्जदाराला आधारसाठी केलेल्या अर्जाचा पुरावा सादर करावा लागेल आणि खाते सुरु झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत आधार क्रमांक जमा करावा लागेल.