मोदींचा 'टाइम' येताच 'टाइम'ची कोलांटी; Divider म्हणणाऱ्यांनी गायली 'नमों'ची आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:02 PM2019-05-29T13:02:27+5:302019-05-29T13:14:42+5:30

टाइम मॅगझिनमधील हा लेख मनोज लडवा यांनी लिहिला आहे.

After Divider-in-Chief comment, Time now says ‘Modi has united India’ | मोदींचा 'टाइम' येताच 'टाइम'ची कोलांटी; Divider म्हणणाऱ्यांनी गायली 'नमों'ची आरती

मोदींचा 'टाइम' येताच 'टाइम'ची कोलांटी; Divider म्हणणाऱ्यांनी गायली 'नमों'ची आरती

googlenewsNext

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय टाइम मॅगझिनने (Time magazine) यू-टर्न घेतला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांना 'डिव्हायडर इन चीफ' (Divider in Chief) असे म्हणणाऱ्या या टाइम मॅगझिनने आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली भूमिका बदली आहे. टाइम मॅगझिनने आता 'Modi Has United India Like No Prime Minister in Decades' अर्थात 'मोदींनी जसे भारताला एकजूट केले आहे, तसे कोणत्याही पंतप्रधानांनी या दशकात केले नाही', असे म्हटले आहे. 

टाइम मॅगझिनमधील हा लेख मनोज लडवा यांनी लिहिला आहे. त्यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 'नरेंद्र मोदी फॉर पीएम' अभियान चालविले होते. या लेखात लिहिले आहे की, 'नरेंद्र मोदींच्या सामाजिक अशा प्रगतशील धोरणांमुळे भारतीय लोक गरिबीमधून बाहेर आले आहेत.ज्यामध्ये हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्यक यांचा सुद्धा समावेश आहेत.' याशिवाय, मोदींच्या धोरणांवर अनेकदा अन्यायकारक टीका झाल्यानंतर सुद्धा त्यांनी गेल्या कार्यकाळात आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांना एकजूट केले आहे. तेवढे जवळपास गेल्या पाच दशकात कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाही, असे या लेखात म्हटले आहे.  

दरम्यान, गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान टाइम मॅगझिनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान देत त्यांचा उल्लेख 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला तोडणारा प्रमुख' असा केला होता. टाइम मॅगझिनने आपल्या आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला होता. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला होता. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध केला होता. 

पंतप्रधान मोदींच्या कारभारावर कडवी टीका करताना टाइम मॅगझिनने नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली होती. तसेच, हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केले नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली होती. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला होता. 'नरेंद्र मोदींनी महान राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिमांचं नातं सुधारावं यासाठी प्रयत्न केले नाहीत. तशी इच्छाशक्ती दाखवली नाही,' अशा शब्दांमध्ये या लेखातून टाइम मॅगझिनने मोदींवर टीकेची झोड उठवली होती. 
 

Web Title: After Divider-in-Chief comment, Time now says ‘Modi has united India’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.