सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : मतदारांना आकर्षित करण्यासाठी २५00 कोटींच्या घोषणांची खैरात करून झाल्यानंतर, अखेर गुजरात विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या़ गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होईल आणि हिमाचल प्रदेशसोबत गुजरातचीही मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होईल, हे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ज्या दिवशी जाहीर झाल्या, त्यानंतर गुजरातच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौºयांमध्ये शेतकºयांना जीएसटीमधून ७८ कोटींची सूट, २६५ कोटींचे फ्लायओव्हर्स, १६६ कोटींचे वॉटर ट्रीटमेंट प्लांटस, ६५0 कोटी खर्चाची रो रो फेरी सेवा, २८५ कोटी खर्चाचा ट्रान्सपोर्ट हब, २८५ कोटी खर्चाचे कचरा निवारण व प्रोसेसिंग युनिट्स अशा जवळपास २५00 कोटींच्या घोषणांची खैरात भाजपाने व गुजरात सरकारने केली, हा विरोधकांचा आरोप आहे.
गुजरातच्या तारखा मुद्दाम विलंबाने जाहीर करण्यात आल्या, असा काँग्रेसचा आरोप कायम आहे. काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीच्या कामात गुंतले होते, त्यामुळे घोषणेला विलंब झाला, असे आयोगाने म्हटले असले, तरी त्यात तथ्य नसल्याचे काँग्रेसने पुराव्यांनिशी दाखवून दिले आहे.
>दोन टप्प्यांत मतदान, १८ डिसेंबरला निकाल
गुजरात विधानसभेसाठी
९ डिसेंबर व १४ डिसेंबर रोजी असे दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येईल. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १८ डिसेंबर रोजी होईल. हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. गुजरातची औपचारिक घोषणा झाली असली, तरी भाजपा व विरोधी काँग्रेसने प्रचाराचे बिगुल आधीच फुंकले आहे. पुढील महिनाभर प्राचाराचा वेग व विखार वाढत जाईल.
>म्हणून झाली आयोगावर टीका
हिमाचल प्रदेश निवडणुकीचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. साधारणत: सहा महिन्यांच्या अंतराने मुदत संपणाºया विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची व त्यांचा कार्यक्रम एकदमच जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र, हिमाचलसोबत गुजरातची निवडणूक जाहीर न केल्याने आयोगावर टीका झाली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिमाचलमध्ये १२ आॅक्टोबर ते १८ डिसेंबर अशी ६३ दिवस निवडणूक आचारसंहिता असेल, तर या गुजरातमध्ये आचारसंहितेचे बंधन जेमतेम दीड महिना असेल. गुजरातची निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनदा तिथे जाऊन विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा व घोषणांचा धडाका लावला होता.
काँग्रेस नेते भरतसिंग सोलंकी व अशोक गहलोत पत्रकार परिषदेत म्हणाले की, पंतप्रधान मोदींसह भाजपाला विविध पायाभरणी व उद्घाटन सोहळे करता यावेत, लोकानुनयाच्या घोषणांचा वर्षाव करण्यास संधी मिळावी, इतकाच आयोगाच्या विलंबाचा उद्देश होता. गुजरातच्या पूरग्रस्त जिल्ह्यातील संबंधित अधिकाºयांनी या संदर्भात जे खुलासे केले, त्यातून जी माहिती सामोरी आली आहे, तीदेखील धक्कादायक आहे, असेही या दोन नेत्यांनी सांगितले.
भरतसिंग सोलंकी म्हणाले की, गुजरातच्या विविध जिल्ह्यांतल्या बहुतांश अधिकाºयांनी मान्य केले की, गुजरातच्या अनेक जिल्ह्यांत
पूर आलेलाच नाही. जिथे पूरस्थिती उद्भवली, तिथले मदतकार्य पूर्वीच पूर्ण झाले आहे.
काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊ स जरूर
झाला. मात्र, त्यानंतर तिथली स्थिती लगेच सामान्य झाली आणि मदतकार्यही फार पूर्वीच पूर्ण झाले, असेही या अधिकाºयांनी
मान्य केले.
>पहिला टप्पा
१९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत ९ डिसेंबर रोजी
>दुसरा टप्पा
१४ जिल्ह्यांतील ९३ मतदारसंघांत १४ डिसेंबर रोजी
४.३३ कोटी एकूण मतदार
५० हजार १२८ मतदान केंद्रे
182 जागा