शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केलं असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झालं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगानं 399 मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित केलं होतं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. धूमल, वीरभद्र आणि अनुराग ठाकूर यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. तर धूमल यांनी 60हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत म्हणाले, धर्मशाळेत सर्वात जास्त 12, तर झंडुतामध्ये सर्वात कमी 2 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आलं होतं.

37 हजार कर्मचा-यांना मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलं होतं. तर इतर राज्यांतील सीमेलगतच्या क्षेत्रातही निमलष्करी दलाच्या जवानांना निगराणीसाठी ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाचा दिवस आहे. मतदारांनी विनंती आहे की, मोठ्या संख्येनं मतदान करा, असंही मोदींनी ट्विट केलं आहे.