महाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 09:25 AM2018-06-26T09:25:52+5:302018-06-26T11:08:58+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खासदारांची एक यादी तयार केली आहे.

5 BJP MP from the Maharashtra state in RSS’s ‘danger’ list | महाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी

महाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी

googlenewsNext

नवी दिल्लीः पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात भाजपा आपली समीकरणं मांडत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या पातळीवर सर्वेक्षण करून, भाजपाच्या 'डेंजर झोन'मधील ४५ खासदारांची यादी तयार केली आहे. त्यात पाच जण महाराष्ट्रातील असल्याचं समजतं. या खासदारांबद्दल मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्याचा फटका त्यांना बसू शकतो, असं संघाच्या सर्वेक्षणातून समोर आलंय. त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. 
 
भिवंडीचे खासदार कपिल पाटील, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे आणि लातूरचे खासदार सुनील गायकवाड या तिघांची नावं या यादीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मतदारसंघातील कामं, पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध आणि बदललेली राजकीय समीकरणं या निकषांच्या आधारे ४५ जणांचा समावेश 'डेंजर झोन'मध्ये करण्यात आला आहे. 

अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फटका बसला आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याचं त्यांनी ठरवलंय. 'मिशन २०१९' कडे वाटचाल करताना प्रत्येक पाऊल त्यांना जपून टाकायचंय. स्वाभाविकच, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि त्यांचे शिलेदार सगळे धोके चाचपून पाहताहेत. त्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मदत घेतलीय. हरियाणात सूरजकुंड इथं १४ ते १६ जून या कालावधीत अनेक बैठका, चर्चासत्र झाली. संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशींसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांनी सद्यस्थितीवर 'चिंतन' केलं. त्यात, काठावर असलेल्या ४५ खासदारांची नावं काढण्यात आल्याचं वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलं आहे.   

पाटील, बनसोडे, गायकवाड का?

कपिल पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे शिलेदार, तर शरद बनसोडे काँग्रेसचे. मोदी लाटेत ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. पण, निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी तितकासा संपर्क ठेवला नाही. मतदारसंघामध्ये भाजपाला आणखी भक्कम करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले नाहीत, असं भाजपाच्या एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. सुनील गायकवाड हेही पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूरच राहिले आणि त्यांनीही कार्यकर्त्यांशी फारसं जुळवून घेतलं नाही, याकडे अन्य भाजपा नेत्यानं लक्ष वेधलं. स्वाभाविकच, या तिघांबद्दल कार्यकर्त्यांची मतं फारशी सकारात्मक नाहीत.

रा. स्व. संघाचा हा अहवाल भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाच्या विजयात संघाच्या संघटनात्मक कामाचा मोठा वाटा होता - आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या यादीवर ते गांभीर्याने विचार करतील, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

Web Title: 5 BJP MP from the Maharashtra state in RSS’s ‘danger’ list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.