सीमेवरील ४०,००० नागरिकांना सोडावे लागले गाव; कुरापतखोर पाकिस्तानचा तोफमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:23 AM2018-01-22T01:23:28+5:302018-01-22T02:20:03+5:30

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे.

 40,000 people on the border have to leave the village; Kurupatkhor Pakistan's Toffmara | सीमेवरील ४०,००० नागरिकांना सोडावे लागले गाव; कुरापतखोर पाकिस्तानचा तोफमारा

सीमेवरील ४०,००० नागरिकांना सोडावे लागले गाव; कुरापतखोर पाकिस्तानचा तोफमारा

Next

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, गावे भयाण आणि ओस पडली आहेत. शाळा बंद पडल्या आहेत. शेतीची कामेही तशीच सोडावी लागली आहेत आणि गुरांनाही सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे.
१९७१ नंतर प्रथमच एवढा तोफमारा -
एवढ्या मोठ्या प्रमाणात उखळी तोफांचा मारा होण्याची ही गेल्या दोन-तीन दशकांमधील पहिली वेळ आहे. पाकिस्तानकडून अशा प्रकारचा हल्ला १९६५ आणि १९७१ मध्ये आम्ही अनुभवला होता, असे सीमेवरील गावात राहणारे ८० वर्षीय यशपाल यांनी सांगितले.
आणखी एक जवान शहीद-
श्रीनगर : पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला असून, या आठवड्यात ११ जण प्राणास मुकले आहेत. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, पूंछ जिल्ह्यात मानकोट सेक्टरमध्ये एका चौकीवर तैनात असलेले जवान सी.के. रॉय शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांना रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत केलेल्या हल्ल्यात जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. यात सैन्याचे तीन जवान शहीद झाले असून, बीएसएफच्या दोन जवानांसह सहा नागरिकांचा समावेश आहे.
काश्मीरला ‘मैत्रीचा पूल’ बनवा-
काश्मीरला ‘युद्धाचा आखाडा’ नव्हे, तर ‘मैत्रीचा पूल’ बनवा, असे आवाहन, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी व पाकिस्तानला केले आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे विकासाच्या गोष्टी करीत आहेत; पण दुसरीकडे काश्मिरात विपरीत घडत आहे. शाळा बंद असून, मुले घरात फसली आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
भारतीय उपउच्चायुक्तांना केले पाचारण; भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा केला कांगावा-
इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानच्या सीमा भागातील गावांत गोळीबार केल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तथापि, पाकिस्तानने भारताचे उपउच्चायुक्त जे.पी. सिंह यांना पाचारण केले.
विदेश मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की, दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक मोहम्मद फैसल यांनी सिंह यांना पाचारण केले आणि भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याबाबत निषेध नोंदविला.
त्यांनी म्हटले आहे की, २० आणि २१ जानेवारी रोजी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. यात ३३ वर्षीय एक पुरुष आणि २५ वर्षीय एक महिला यांचा मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक मुलगी जखमी झाली.

Web Title:  40,000 people on the border have to leave the village; Kurupatkhor Pakistan's Toffmara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.