चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:55 AM2019-06-27T10:55:32+5:302019-06-27T10:55:42+5:30

गेल्या चार वर्षांत 19 लढाऊ विमानं अपघातग्रस्त

33 IAF Aircraft Including 19 Fighter Jets Met with Accident Since 2015 | चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

नवी दिल्ली: हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. 2015-16 पासून भारतीय हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये 19 लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी आकडेवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं एएन-32 विमान काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालं. त्याचीही माहिती राजनाथ यांनी सभागृहाला दिली. 

हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अपघात झाला. यामध्ये हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एएन-32 विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र एएन-32 विमानं अतिशय उपयुक्त असून ती यापुढेही हवाई दलाच्या सेवेत असतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी 2015-16 पासून झालेल्या अपघातांचीही माहिती दिली. 2015-16 या वर्षात हवाई दलाची चार लढाऊ विमानं आणि प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, वाहतूक विमान आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलं, असं राजनाथ यांनी सांगितलं. 



2016-17 या आर्थिक वर्षात हवाई दलाची सहा लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळल्याची आकडेवारी सिंह यांनी दिली. तर 2017-18 मध्ये हवाई दलानं दोन लढाऊ विमानं आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी तीन विमानं गमावल्याचंही सिंह म्हणाले. 2018-19 मध्ये हा आकडा आणखी वाढला. या वर्षात हवाई दलाची सात लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी दोन विमानं अपघातग्रस्त झाली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिग-21 या विमानाचाही समावेश आहे. 



अभिनंदन यांचं मिग-21 विमान 27 फेब्रुवारीला कोसळलं. त्याच दिवशी एमआय-17 हेलिकॉप्टरदेखील दुर्घटनाग्रस्त झालं. त्यामध्ये हवाई दलाच्या सहा जणांचा मृत्यू झाला. 2019-20 या वर्षात आतापर्यंत एका विमानाचा अपघात झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एएन-32 विमानाचा अपघात झाला. त्यात 13 कर्मचारी मृत्यूमुखी पडले.  
 

Web Title: 33 IAF Aircraft Including 19 Fighter Jets Met with Accident Since 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.